विमानतळ प्रकल्पबाधितांच्या प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा
| पनवेल | वार्ताहर |
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दैवत लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांच्या प्रलंबित मागण्यांसाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कमिटी संलग्न अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने पनवेल ते मंत्रालयावर मोर्चाचे आयोजन सोमवारी (दि.1) रोजी करण्यात आले होते. यावेळी विमानतळ परिसरातील सर्व्हिस रोडवर पोलिसांनी मोर्चा अडवल्यानंतर आंदोलकांनी ठिय्या मांडून प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन केले.
विमानतळ प्रकल्पबाधितांच्या विविध प्रश्नांवर गेली 4 ते 5 वर्षे सातत्याने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कमिटी संलग्न अखिल भारतीय किसान सभेच्या माध्यमातून विविध आंदोलनाच्या माध्यमांतून प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अनेक बैठका झाल्या परंतू सिडको महामंडळाने आमच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या प्रलंबित असून वाघीवली गावातील प्रकल्पग्रस्तांना तातडीने घरांच्या भूखंडाचा ताबा द्यावा, वाघीवली गावातील ज्या लोकांनी घरे तोडलेली आहेत त्यांना आतापर्यंत तसेच पुढील प्लॉटचा ताबा देऊन ओ.सी. मिळेपर्यंत मार्केटप्रमाणे घरभाडे भत्ता चालू ठेवावा, प्रकल्पबाधित मच्छिमारांना पुनर्वसनासाठी नुकसान भरपाई द्यावी, 10 गावातील बेरोजगार युवक व युवतींना विमानतळातील नोकर्या उपलब्ध होण्यासाठी रोजगारक्षम प्रशिक्षण द्यावे, चिंचपाडा तलावपाली येथील घर मालकांना त्यांना तिप्पट भुखंड व आर्थिक सहाय्य पुर्ण पॅकेज मिळाले पाहिजे, ज्यांची घरे सिडकोने तोडली आहेत. त्यांना बांधकाम खर्च रु. 1500/- प्रमाणे देण्यात यावा, प्रलंबित असलेल्या सी.सी. व ओ.सी. तातडीने देण्यात याव्या, पुर्नवसीत आर. आर. (उलवे व करंजाडे) क्षेत्रात नागरी सुविधा पुरवाव्यात अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
विमानतळ प्रकल्पबाधित भूमिपुत्रांच्या जमिनी ताब्यात घेऊन त्याबदल्यात योग्य मोबदला देण्याच्या वल्गना सिडको प्रशासनाने दिल्या. मात्र सिडकोने प्रकल्पग्रस्तांची सपशेल फसवणूक केली आहे. विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील साहेबांचे नाव देण्यात यावे ही प्रकल्पग्रस्तांची प्रमुख मागणी आहे. यासह प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. त्यामुळे भर पावसात प्रकल्पग्रस्तांना रस्त्यावर उतरून मोठा संघर्ष करण्याची वेळ आली आहे. या लढ्यात काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनीशी उतरेल आणि आमचा हक्क मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी ठाम भूमिका पनवेल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी यांनी व्यक्त केली.
तर सिडकोने प्रकल्पग्रस्तांना ज्या पॅकेजचे आश्वासन दिले त्याबाबत अद्यापही पूर्तता केलेली नाही. सिडकोने प्रकल्पग्रस्तांच्या घरावर तोडक कारवाई करूनही योग्य मोबदला दिलेला नाही. प्रकल्पग्रस्तांना दाखला देऊन विमानतळात नोकर्या मिळणे आवश्यक आहे. विमानतळाच्या कंपाउंड वॉलवर विमानतळ उभारणार्या कंपनीचे व सिडकोचे टाकले आहे. त्यामुळे विमानतळाला दीबांचे नाव दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, अशी भूमिका अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केली. याप्रसंगी पनवेल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी, अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे, किरण केणी, वाघिवली सरपंच अनिल पाटील, संजय ठाकूर, ऍड. प्रशांत भोईर, विशाल भोईर, विजय भगत, सुधाकर कोळी, श्रीधर पाटील, सतीश कोळी, अंकुश भगत, वाघिवली, चिंचपाडा ग्रामस्थ व विमानतळबाधित 10 गावातील प्रकल्पग्रस्त, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.







