पेण येथे अनंत गीतेंच्या निवडणूक कार्यक्रमाचा शुभारंभ
| पेण | प्रतिनिधी |
आजपर्यंत उद्योगधंद्यांच्या माध्यमांतून जवळपास चार हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून मी देत आहे. तटकरेंचा उद्योग काय? टक्केवारी हाच तटकरेंचा उद्योग आहे, अशी घणाघाती टीका शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी सुनील तटकरेंवर केली. शेकापक्षाच्या ताकदीबद्दल बोलत असाल तर शेकापची ताकद काय आहे, हे याअगोदर दाखवून दिले आहे. एका मताने केंद्रातील सरकार पाडण्याची ताकद शेकापक्षाचीच होती. शेकापक्षाने एकदा शब्द दिला की परत माघार नाही, आपला पुरेपूर शब्द पाळतात. महाविकास आघाडीला शब्द दिला होता; तो कालही पाळला आणि आजही पाळत आहोत. रातोरात स्वार्थासाठी मतपरिवर्तन करणारा शेकाप नाही, असा टोलाही आ. पाटील यांनी लगावला. पेण येथे इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या निवडणूक कार्यालयााचा शुभारंभ गुरुवारी (दि. 25) आमदार संजय पोतनीस आणि आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी आ. पाटील यांनी सुनील तटकरे यांचा खरपूस समाचार घेत जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधन केले.
आ. पाटील म्हणाले की, रायगडच्या जनतेला सुनील तटकरे काय आहे आणि जयंत पाटील काय आहे हे माहीत आहेत. सुनील तटकरे म्हणजे विश्वासघातकी माणूस हे नव्याने मी सांगायची गरज नाही. आज सुनील तटकरे यांना लोकसभेला मी उमेदवार असल्याचे स्वप्न पडत आहे. अनंत गीते यांना सोडून मला आणि माझ्या पक्षावर बोलले जात आहे. कालही रायगडमध्ये शेकाप होता आणि आजही आहे. आजच्या घडीला चार लाख मत रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाचे आहेत. कधी काळी सुनील तटकरे माझे मित्र आमदार रविशेठ पाटील यांच्या ट्रकने प्रवास करायचे, याचा विसर त्यांना पडला आहे.
यावेळी शिवसेनेचे आमदार संजय पोतनीस, समाजसेविका उल्का महाजन, पी.डी. पाटील, गुरूनाथ मांजरेकर, अतुल म्हात्रे, प्रसाद पाटील, अशोक मोकल, नंदा म्हात्रे, सुरेंद्र म्हात्रे, स्मिता पाटील, दिपश्री पोटफोडे, महादेव दिवेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आ. पोतनीस यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, देश आज संकटात आहे. त्याला वाचवण्यासाठी इंडिया आघाडीच्या उमेदवारांना निवडून देणे गरजेचे आहे. रायगडच्या गद्दारांना गाडण्यासाठी संघटित होऊन काम कराचे आहे. तर, उल्का महाजन यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की, तटकरेंनी लोकशाहीशी गद्दारी केली आहे. मागच्या निवडणुकीत आम्ही राजकीय पक्षविरहीत संघटनांनी त्यांना मदत केली, त्यावेळी त्यांनी शपथ घेतली होती की, आपण भाजपच्या विरूद्ध लढणार. भाजपचे जे मनसुबे आहेत, ते पूर्ण होऊ देणार नाही, भाजप पक्षात सामील होणार नाही अथवा भाजपची मदत घेणार नाही. भाजपला मदत करणार; परंतु त्यांनी ही शपथ मोडून लोकशाहीशी व मतदारांशी गद्दारी केली आहे. यावेळी त्यांना जनता माफ करणार नाही. तसेच शेकाप तालुका चिटणीस महादेव दिवेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कृतघ्नतेचा कळस निवडणुका येतात, निवडणूका जातात. परंतु, कालचे विचार आज विसरायचे नसतात. या शरद पवारसाहेबांनी या माणसाला एवढा मोठा केला, त्यांच्या सभेच्या समोर सभा घेऊन हा माणूस किती कृतघ्न आहे हे दाखवून दिले. त्या सभेला माणसं किती 150. आज रायगड जिल्ह्यातील मुस्लीम समाज तटकरेंच्या विरूद्ध प्रचारात सामील झाला आहे. त्यांना उद्धव ठाकरे हे जवळचे नेते वाटत आहेत. त्यातच सर्व काही आले. आज रायगड जिल्ह्यात तटकरेंविरुद्ध हवा आहे आणि मतपेटीत दिसणार, असे शेवटी आ. पाटील यांनी सांगितले.