टॅक्सी संघटनेची मागणी
। नेरळ । वार्ताहर ।
नेरळ-माथेरान घाटात विकेंडला वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे अनेकदा पर्यटकांना दोन ते तीन किलोमीटरचे अंतर घाटातील चढावावर पायी चालत जावे लागते. यावर माथेरान गिरिस्थान नगरपरिषद आणि पोलीस प्रशासन यांनी मार्ग काढावा, अशी मागणी नेरळ-माथेरान दरम्यान प्रवासी वाहतूक करणारी टॅक्सी संघटनेने केली आहे.
माथेरान येथील दस्तुरी नाका येथील चार पार्किंगमध्ये किमान 500 वाहने एकाचवेळी पार्क केली जाऊ शकतात. मात्र, शनिवार तसेच रविवार आणि सुट्टीच्या दिवशी पर्यटनाची गर्दी वाढत असते. त्यामुळे सकाळच्या वेळी वाहनांच्या रांगा नेरळ-माथेरान घाटरस्त्यात लागतात. त्यात वाहनांची गर्दी होत असताना पार्किंग मधील वाहणारे एकाच वेळी बाहेर पडणे हे देखील महत्त्वाचे असते. प्रशासनाने पर्यटन हंगामात सर्व खासगी वाहनांसाठी दस्तुरी नाका येथील वाहनतळ बंद ठेवून जुम्मापट्टी येथेच वाहनतळ सुरु करावा यासाठी तेथे वन विभागाकडून तात्पुरत्या वाहनतळ बनविण्यासाठी जाग उपलब्ध करून घ्यावी आणि त्यांनतर त्या वाहनतळ येथे सुरक्षा रक्षकदेखील तैनात करावेत आणि पर्यटकांच्या वाहनांची काळजी घ्यावी, अशी सूचना नेरळ माथेरान टॅक्सी संघटना यांनी केली आहे. घाटात वाहतूक कोंडी झाल्यास रुग्णवाहिका यांनादेखील अडचणी निर्माण होत असतात. त्यामुळे नेरळ-माथेरान घाटात सतत होणारी वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने ठोस कार्यक्रम राबवावा, अशी मागणी नेरळ-माथेरान टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष नरेश कराळे यांनी प्रशासनाकडे केली आहे.







