गुड न्यूज! पुन्हा धुरळा उडणार…अखेर बैलगाडी शर्यतीला मिळाली परवानगी

। अलिबाग । प्रतिनिधी ।
गावाबाहेरच्या मोकळ्या मैदानात किंवा समुद्र सपाटीवर भरवण्यात आलेल्या शर्यती, त्यात वेगाने धावणार्‍या बैलगाड्या, त्यांना टाळ्या वाजवून, ओरडून प्रोत्साहन देणारे प्रेक्षक, विजेत्या बैलजोडीचे नाव पुकारल्यावर होणार जल्लोष, गुलालाची उधळण करत त्या बैलजोडीची उत्साहात काढलेली मिरवणूक हे सारे अंगावर रोमांच आणणारे चित्र पुन्हा अनुभवण्यास मिळणार आहे. सुप्रीम कोर्टाने बैलगाडी शर्यतीला सशर्त परवानगी दिली. त्यामुळे बैलगाडी प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारने जी नियमावली तयार केली आहे त्यानुसार यापुढे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येणार आहे

महाराष्ट्राला बैलगाडी शर्यतींची शेकडो वर्षांची परंपरा लाभली आहे. पारंपरिक संस्कृतीचा वारसा आणि शेतकर्‍यांचा छंद तसेच कडधान्यांची मागणी या तीनही बाबी या बैलगाडी शर्यतीशी निगडित आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून बैलगाडी शर्यत हा चर्चेचा विषय बनला होता. कधी बैलगाडी शर्यत सुरु करण्याचा निर्णय देण्यात आला तर कधी पुन्हा बैल शर्यतीवर स्थगिती आणली जात होती. एकूणच काय तर ब्रिटिश राजवटीसारखे दिवस पुन्हा सर्वसामान्यांच्या नशिबी आल्याचे चित्र उभे राहिले होते. मात्र बैलगाडी प्रेमींनी हार न मानता लढा कायम ठेवला. अखेर त्यांच्या लढ्याला यश आले.

महाराष्ट्रात परंपरेनुसार चालत आलेल्या बैलगाडी शर्यतीवर बंदी घालण्याची मागणी पेटा संघटनेने केली होती. राज्यात बैलगाडी शर्यत सुरू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राने बैलगाडा शर्यत सुरू करण्याच्या संदर्भात 2017 मध्ये एक कायदा संमत केला होता. मात्र, त्याला मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर स्थगिती दिली होती. त्यानंतर राज्य सरकारने या आदेशाला अनुसरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

शेतकर्‍यांचा वर्षानुवर्षे सुरु असलेला या खेळावर बंदी आणल्याने शेतकरी नाराज झाले होते. राज्य सरकारने मुकूल रोहतगी यांच्यासारखे अतिशय मोठे वकिल या प्रकरणासाठी उभे केले होते. आजच्या निर्णयानंतर बैलगाडीप्रेमींमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी वर्गाला याचा आनंद झाला आहे. अनेक सरकारे आली आणि गेली. बैलगाडा शर्यतवर बंदी असल्याने, न्यायालयात प्रकरण असतांना शेतकर्‍यांना नाराजी पत्करावी लागायची. अनेकदा शेतकरी शर्यती घ्यायचा प्रयत्न करायचे.

महाराष्ट्रात पुन्हा बैलगाडी शर्यत सुरू करावी ही शेतकर्‍यांची आग्रही मागणी होती. गेल्या 15 वर्षांपासून याबाबत ठोस निकाल हाती येत नव्हता. यासाठी सर्व स्तरांवरून प्रयत्न सुरू होते. आंदोलने झाली, आम्ही विधिमंडळातील सभागृहात हा प्रश्‍न लावून धरला होता. इतर राज्यांमधील निकषांनुसार निर्णय द्यावा, अशी आमची मागणी होती. मात्र आता सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यत सुरू करण्याची परवानगी दिली आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे. 15 वर्षे बैलगाड्यांच्या शर्यती बंद होत्या. सर्वोच्च न्यायालयाची मार्गदर्शक तत्वासाठी सातत्याने मागणी सुरू होती. शेतकर्‍यांच्या दृष्टीकोनातून शर्यती सुरु करण्याची मागणी होती. त्यामुळे आजचा आनंदाचा दिवस आहे. आम्ही सातत्याने या शर्यती सुरु करण्याची मागणी करीत होतो. पुण्यातले सर्व आमदार, शेतकरी संघटनेचे नेते सोबत होते. ज्यांनी ज्यांनी यासाठी प्रयत्न केले. 40 आमदारांसोबत आम्ही पाठपुरावा केला. जिल्ह्यातील समुद्रकिनार्‍यांवर शर्यती सुरु झाल्यावर स्थानिक शर्यत प्रेमी जनतेबरोबरच पर्यटक देखील याचा आनंद उपभोगतील असा विश्‍वास वाटतो. निकालाची सर्व स्पष्टता आली पाहिजे. पुन्हा या शर्यतींमध्ये अडथळा येता कामा नये. तो येऊ नये यादृष्टीने याची अंमलबजावणी राज्यात व्हावी अशी मागणी मी करतो.
आ. जयंत पाटील
सरचिटणीस शेतकरी कामगार पक्ष

शेतकर्‍यांच्या मागणीला यश
भारतातील तामिळनाडू, कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, पंजाब, गुजरात, छत्तीसगढ येथे आजही बैलगाडी शर्यती सुरू आहेत. पण मुंबई उच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे महाराष्ट्रात शर्यतींना बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू व्हाव्यात ही मागणी होती. अखेर सुप्रीम कोर्टाने परवानगी दिल्याने शेतकर्‍यांनी आंनद गगनात मावेनासा झाला आहे.

खिल्लारी जात वाचण्यास मदत

सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा स्वागतार्ह आहे. शर्यतील परवानगी देताना अटीशर्ती बंधनकारकच होतं. नियम नसतील तर बैलांना मारहाणीचे प्रकार घडतात. त्यामुळे त्यांचे आयुष्य कमी होऊ शकतं. या निर्णयामुळे बैलांच्या किंमतीत फारसा चढ-उतार होणार नाही. या निर्णयामुळे खिल्लारी जातीच्या बैलांना चांगले दिवस येतील. रायगड जिल्ह्यात शर्यतीसाठी खिल्लारी जातीचे बैल घेतले जातात. मात्र शर्यतीवरील बंदीमुळे या जातीच्या बैलांची मागणी कमी झाली. परिणामी, त्यांची रवानगी छुप्या पद्धतीने कत्तलखान्यात होत होती. मात्र या निर्णयामुळे लोप पावत चाललेल्या खिल्लारी जातीच्या बैलांना चांगले दिवस येतील.

महेश सावंत, बैलगाडी मालक

Exit mobile version