| नेरळ | वार्ताहर |
नेरळ येथील विद्या विकास मंडळ संस्थेच्या विद्या विकास मंदिर शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्याता आले होते. 15 दिवसीय व्यक्तिमत्व विकास शिबिरात विद्यार्थ्यांना अनेक प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले असून सलग दुसर्या वर्षी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
15 एप्रिल 2024 ते 27 एप्रिल 2024 या कालावधीत व्यक्तिमत्त्व विकास शिबीर पार पडले. 100 हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग असलेल्या या शिबिराचे उद्घाटन विद्या विकास मंडळाचे कार्यवाह अमित जोगळेकर आणि विद्या विकास मंडळाचे सदस्य विनायक पिंपुपटकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शैलजा निकम तसेच, इंग्रजी विभागाच्या मुख्याध्यापिका, प्राथमिक विभागाच्या ज्येष्ठ शिक्षिका, बालवाडी विभागाच्या ज्येष्ठ शिक्षिका तसेच सहशिक्षीका व विद्यार्थी उपस्थित होते.
विद्या विकास मंडळाचे माजी उपाध्यक्ष तसेच, सल्लागार सदस् अरुण धारप यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा व्यक्तिमत्त्व विकास शिबिर कार्यक्रम सलग दोन वर्षे अतिशय सुंदर प्रतिसादात सुरू आहे. या कार्यक्रमाचा समारोप प्रसंगी संस्थेचे कार्यवाह अमित जोगळेकर तसेच मुख्याध्यापिका शैलजा निकम, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विनया काकडे तसेच, सर्व शिक्षिका यांनी या शिबिरात सहभागी झालेल्या प्रशिक्षकांना विद्यार्थ्यांनी स्वहस्ते बनविलेल्या वस्तू भेट म्हणून दिल्या.
या पंधरा दिवसांच्या कालावधीत शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये विविध कलागुण विकसित करण्याचा प्रयत्न केला. या शिबिरात विद्याविकास मंडळाच्या सदस्या आणि माजी मुख्याध्यापिका आसावरी काळे यांनी विद्यार्थ्यांना छान गोष्टी शिकवल्या. जेष्ठ शिक्षिका तुपगावकर यांनी विद्यार्थ्यांना योगा प्रशिक्षण दिले. शिक्षिका गोतारणे, कांचन, रोशनी, गोळे आणि बदे यांचा देखील या शिबिरात सहभाग होता. त्यांनी विद्यार्थ्यांना कागदकाम, लोकरकाम, मायक्रम, लाठी-काठी इत्यादी प्रशिक्षण दिले आणि त्यानंतर त्यांच्याकडून हस्तकला विषयाशी संबंधित अनेक वस्तूंची निर्मिती देखील केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते हरी काळे यांनी मुलांना पारंपरिक खेळ शिकवले. तसेच विद्यार्थ्यांना बँकांचे अर्थकारण कळले पाहिजे यासाठी क्षेत्रभेटमध्ये बँक ऑफ बडोदा नेरळ शाखा आणि गणपती कारखाना कुंभार आळी येथे भेट देण्यात आली. त्यावेळी शाडूच्या मूर्ती बनविणारे मूर्तिकार यांनी मातीपासून गणेशमूर्ती कशी बनवावी हे शिकवले. बँकेच्या कामकाजाची माहिती विद्यार्थ्यांना दिली.