कर्जत | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच आणि विद्यमान सदस्या मोनिका साळोखे यांच्याविरोधात ग्रामपंचायतीमध्ये केलेल्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी स्थानिक ग्रामस्थ रामदास शेलार यांनी रायगड जिल्हा परिषद आणि मा. कोकण आयुक्त कोकणभवन यांच्याकडे तक्रार केल्यानंतर मोनिका साळोखे यांचे सदस्यपद 16 एप्रिल 2019 रोजी रद्द केले होते. त्यानंतर मोनिका साळोखे यांनी ग्रामविकास विभागाकडे अपील दाखल केला होता. येथे मोनिका साळोखे या निर्दोष असल्याचे सिद्ध झाल्याने रामदास शेलार यांनी माजी सरपंच मोनिका साळोखे यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
मोनिका साळोखे यांनी 5 डिसेंबर 2014 रोजी सरपंचपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये केलेल्या अपहारप्रकरणी कर्जत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्याकडे तक्रार केली होती. कर्जत पंचायत समिती, आणि रायगड जिल्हा परिषद यांच्या अहवालानुसार मोनिका साळोखे यांना दोषी ठरवून त्यांचे 16 एप्रिल 2019 सदस्य पद रद्द करण्याची कारवाई केली होती. त्यानंतर मोनिका साळोखे यांनी यासंदर्भात थेट राज्याच्या ग्रामविकास विभागाकडे अपील केले होते. ग्रामविकास विभागाने मोनिका साळोखे यांनी कोणताही अपहार केला नसल्याचे सिद्ध करून त्या निर्दोष असल्याचा निकाल ग्रामविकास विभागाने दिला आहे.
ग्रामविकास विभागाने त्यांना निर्दोष सिद्ध केले आहे. त्या दोषी असताना त्यांच्या बाजूने निकाल दिल्याने आम्ही त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल केला आहे.
रामदास शेलार, तक्रारदार, ग्रामस्थ