| सुधागड/पाली | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील सुधागड पालीमध्ये सध्या पेट्रोल टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोलचा साठा संपल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरवाढ होण्याच्या अफवांमुळे नागरिकांनी अचानक मोठ्या प्रमाणावर पेट्रोल पंपांवर गर्दी केल्याने अल्पावधीतच इंधनाचा साठा संपल्याची माहिती समोर आली आहे.
तालुक्यातील अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल पूर्णपणे संपले असून, काही ठिकाणी डिझेलचाही तुटवडा जाणवत आहे. परिणामी, अनेक वाहनचालकांना रिकाम्या टाकीमुळे प्रवासात अडथळे निर्माण होत आहेत. काही वाहनचालकांची वाहने रस्त्यातच बंद पडल्याच्या घटना घडल्याने नागरिकांची गैरसोय वाढली आहे.
दरम्यान, सुधागड पाली परिसरासह तालुक्यातील काही भागांत सध्या केवळ सीएनजी पंप सुरू असल्याने त्या पंपांवरही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. इंधनाच्या अभावामुळे प्रवाशांना तसेच स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. इंधनाचा पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्यात यावा, जेणेकरून वाहनचालक व नागरिकांना होणारा त्रास कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नागरिकांनीही वाहनचालकांना आवाहन करत अनावश्यक प्रवास टाळावा, इंधनाची उपलब्धता लक्षात घेऊनच वाहनांचा वापर करावा आणि इंधनाचा काटकसरीने वापर करावा, असे सांगितले आहे. पेट्रोल टंचाईमुळे तालुक्यात सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.







