फणसाड धरण बनले वर्षाविहाराचे आकर्षण

| कोर्लई | वार्ताहर |
मुरुड-जंजिरा पर्यटनात निसर्गरम्य अशा हिरव्यागार वनश्रीने नटलेल्या वातावरणात वर्षाविहाराची मजा काही औरच असते. नुकताच जुलै महिन्याचा दुसरा आठवडा सरलेला असून, समाधानकारक पडणार्‍या पावसाने फणसाड धरण तुडुंब भरुन वाहू लागले आहे. त्यामुळे वर्षा विहारात फणसाड धरण निसर्गप्रेमींचे आकर्षण ठरले आहे.

अलिबाग-मुरुड रस्त्यावर भोईघर फाट्यापासून अवघ्या 4 कि.मी. अंतरावर असलेले हे धरण फणसाड अभयारण्यातून येणारे मोठे पाणलोट क्षेत्र असल्याने या परिसराला निसर्गाचे वरदान लाभले आहे. धरणावरुन खळखळणार्‍या धबधब्याचा मनोसक्त आनंद लुटण्यासाठी मुंबई, पुणे, खोपोली, अलिबाग येथून पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात. कुटुंबासह येणारे निसर्गप्रेमी, तरुणवर्ग यांचा यात वाढता उत्साह दिसून येतो. मुरुडला पर्यटन क्षेत्राचा दर्जा लाभल्याने या भागात निसर्गप्रेमींचा वर्षा विहारात, उत्साही सहभागाबरोबरच बर्‍याच पर्यटकांमध्ये निसर्गरम्य वातावरणात तरुणाई धांगडधिंगाणा, मद्यप्राशनाचे वाढते प्रकार आणि ओथंबून वाहणारा अतिउत्साह यामुळे वेळप्रसंगी अपघाताचे गालबोट लागण्याची शक्यता निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. निसर्गप्रेमींनी अशा प्रकाराला कोठेतरी आवर घालणे अत्यंत आवश्यकता आहे. फणसाड धरणावर येणार्‍या पर्यटकांसाठी शासनाने सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी या भागातील नागरिकांकडून जोर धरीत आहे.

Exit mobile version