फणसाड धरणाला तरुणाईची पसंती

। अलिबाग । वार्ताहर ।

पावसाळा सुरू झाला की तरुणाईला वेध लागतात ते वर्षासहलीचे. डोंगर कपार्‍यातून वाहणारे धबधबे, धरणातील धावणारे पाणी अंगावर घेण्यासाठी आतुरलेली युवा मंडळी वर्षासहलीचे प्लॅनिंग करतात. मुरूड तालुक्यातील फणसाड अभयारण्यातील फणसाड धरणाला तरुणाईच्या उत्साहाचा बहर वर्षासहलीच्या निमित्ताने पहावयास मिळतो.

मुरूड तालुक्यातील बोर्ली येथून अंदाजे सहा ते सात कि.मी. अंतरावरील वळणा-वळणाच्या रस्त्याने जाऊन भोईघर गावावरून पुढे काजुवाडी, बेलवाडी गावाच्या पुढे डोंगरात फणसाड अरण्यातील फणसाड धरणावर जाता येते. पावसाळी पाण्याने तुंडूब भरलेले धरण तसेच आजूबाजूच्या डोंगर कपारीतील मनमोहक दृश्य, धरणावरून काजुवाडी तसेच बेलवाडी गावासह धरणामुळे परिसरातील हिरवीगार शेतीतील नांगरणीचे दृश्य डोळ्यांना विलोभनीय निसर्गसौंदर्याची भुरळ पाडते. फणसाड धरणातून बोर्ली पंचक्रोशीतील बावीस गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. शासनाच्या पाटबंधारे विभाग कोलाडच्या अखत्यारीत हे धरण असल्याचे सांंगितले जाते. परंतु, नजीकच्या भोईघर ग्रामपंचामतीच्या हद्दीत असलेल्या फणसाड धरणाचे सोयरसुतक नसल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे ग्रामपंचायतीमार्फत येथे वर्षासहलीप्रेमी मंडळींसाठी सुविधा पुरविल्या जात नाही, असे म्हटले जाते.

फणसाड धरणाला वर्षा सहलीच्या निमित्ताने तरूणाईची मोठी पसंती आहे. पावसाळ्यात दर शनिवार तसेच रविवारी मोठी गर्दी पहावयास मिळते. डोंगर कपारीत वसलेल्या निसर्गसौंदर्याची मुक्त हस्ते उधळण असलेला परिसर युवावर्गाला भावतो, मनमोकळेपणाने एक वेगळा आनंद मिळविता येतो. धरणातून वाहून जाणार्‍या पाण्यात ओलेचिंब भिजत बसण्याची मज्जा काही औरच असते. नेहमीच दगदगीच्या जीवनातून वनडे पिकनिक म्हणून फणसाड धरणाचे महत्त्व पावसाळ्यात दिवसेंदिवस वाढत आहे. पुढे सुविधांची उपलब्धता होईलच; परंतु तरूणाईच्या उत्साहाला सुरक्षितेचे कवच फारच जरूरीचे आहे. नाहीतर फणसाड धरणाच्या वर्षासहलीना गालबोट लागू शकेल. मात्र, फणसाड धरणाचे वर्षासहलीचे महत्त्व वाढले तर निश्‍चितच स्थानिकांना रोजगाराचे साधन निर्माण होईल, हेही खरेच.

Exit mobile version