वर्षापर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी
| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
पावसाळा सुरू झाला की, पर्यटकांची पावले आपोआप रायगडातील धरण, धबधबे, हिलस्टेशनकडे वळतात. दरवर्षी हजारो पर्यटक पावसाळ्यात या ठिकाणांना भेट देत असतात. मुरुड येथील फणसाड धरण पर्यटकांचे खास आकषर्ण ठरत आहे. मागील काही दिवसांपासून धरण परिसरात जोरदार पाऊस पडत असल्याने फणसाड धरण जोरदार वाहू लागले आहे. पर्यटकांसाठी ही आनंदात बातमी असून, मोठ्या संख्येने वर्षापर्यटनासाठी पर्यटक गर्दी करु लागले आहेत.
मुंबईपासून 154 कि.मी. अंतरावर पनवेल-पेण-अलिबाग मार्गावर 52 चौरस कि.मी. क्षेत्रावर विस्तारलेल्या फणसाड अभयारण्याला जणू निसर्गाचा वरदहस्तच लाभलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात फणसाड अभयारण्याचे क्षेत्र मुरुड जंजिरा संस्थानाचे सर्वेसर्वा नवाब सिद्दी यांचे राखीव शिकार क्षेत्र होते. येथील जैवविविधतेचे संरक्षण व्हावे या हेतूने महाराष्ट्र शासनाने दि. 25 फेब्रुवारी 1986 मध्ये फणसाड वन्यजीव अभयारण्य घोषित केले. भारतातून हजारो पर्यटक फणसाडला भेट देतात आणि खासकरून पावसाळी अतिशय सुंदर वातावरण असते. घनदाट झाडी असल्याने पावसाचे प्रमाण खूप आहे आणि उंचावर असल्याने पावसात धुक्यासारखे वातावरण असते. शेकडो पाणवठे पावसाच्या पाण्याने भरून जातात, प्राणी जलक्रीडा करण्यासाठी पाणवठ्यावर येतात. फणसाड धरण फुल्ल भरून त्याच्या वाहून जाणार्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक बोर्लीमांडलामार्गे भोईघर गावात येतात. गावातून धरण 10 मिनिटांवर असल्याने गावाला पर्यटन व्यवसाय मिळतो. फणसाड धरणावर हिरव्यागार भातशेतातून जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो.
जंगलात सुमारे 718 प्रकारचे वृक्ष, 17 प्रकारचे सस्तन प्राणी, 164 प्रकारचे रंगीबेरंगी पक्षी, 27 प्रकारचे साप व अनेक वन्य श्वापदे आढळतात. फणसाड अभयारण्यात साग व निलगिरीची रोपवने यासह प्रामुख्याने ऐन, किंजळ, जांभुळ, द्वेद, कुडा, गेळा, अंजनी, कांचन, सावर, अर्जुन हे वृक्ष व कर्करोगावर गुणकारक नरक्या याबरोबरच सीताअशोक, सर्पगंधा, कुरडु, रानतुळस, कढीपत्ता, उक्षी या औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळून येतात. वाकेरी, वाघाटी, पळसवेल, पेंटगुळ इत्यादी प्रकारच्या वेली व जगातील सर्वात लांब वेलींपैकी एक असलेली गारंबी आढळून येते. फणसाड वन्यजीव अभयारण्यात 17 प्रकारचे वन्यप्राणी आहेत. यामध्ये रानससा, सांबर, भेकर, पिसोरी, साळींदर, तरस, रानडुक्कर, मुंगूस, कोल्हा, वानर, माकड, रानमांजर व बिबट्या आणि पर्यटकांच्या व अभ्यासकांचे आकर्षण असलेले शेकरू येथे हमखास दृष्टीस पडते.
अभयारण्यात भटकंतीसाठी विशेष वाटा (ट्रेल) तयार केल्या आहेत. त्यात फणसाडगाण, धरणाधीमान, चिखलगाण, सावर तलाव सुपेगाव देवराई याचा समावेश आहे. गाण म्हणजे पाण्याची जागा. फणसाड वन्यजीव अभयारण्यात तब्बल 27 पाणस्थळे आहेत. यातील चिखलगाया पाणस्थळावर अनेक पक्षी, प्राणी येतात. त्यांचे जवळून निरीक्षण करता यावे, याकरिता येथे खास एक लक्षगृह बांधण्यात आले आहे, तसेच पुण्याचा माळ, चाकाचा माळ, दांडा, गाडग्याचा माळ या ठिकाणी निरीक्षणासाठी उंच मनोरे उभारण्यात आले आहेत. यातून दिसणारे दृश्य मन मोहून टाकते. स्थानिकरित्या आढळणारे जांभा दगडातील नवाबाने खास शिकारीसाठी बांधले आडोसे जागोजागी आजही पहावयास मिळतात. येथील पर्यटकांच्या सुविधेसाठी आखण्यात आलेल्या आहेत. ठराविक प्राणी-पक्षी या ठिकाणी हमखास दर्शन देतात. पर्यटकांना वनभोजनाचा आनंद गावातील महिला बचत गट स्वस्त व चविष्ट भोजन देतात, तर या यंदाच्या पावसात फणसाड अभयारण्य भेट द्या.