| माथेरान | प्रतिनिधी |
माथेरान मिनी ट्रेनचे जनक स्वर्गीय आदमजी पीरभॉय व त्यांचे सुपुत्र हुसेन पूर्व यांचे चित्र माथेरान रेल्वे स्टेशन येथे त्यांनी माथेरान मिनीट्रेनसाठी केलेले कार्य येथे येणार आहे. पर्यटकांच्या कायम स्मरणात राहावे याकरिता लावले होते; परंतु मागील एक वर्षापासून हे चित्र येथून गायब झाले होते व ते चित्र पुन्हा लागावे याकरिता आदमजी पीरभॉय यांचे नातू अली अकबर पिरभॉय हे रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत होते. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, बुधवारी हे चित्र पुन्हा माथेरान स्थानकामध्ये लावण्यात आले आहे.
माथेरानच्या पर्यटनामध्ये मिनी ट्रेनचे स्थान अनन्यसाधारण आहे, कारण माथेरानचे पर्यटन व अस्तित्व खऱ्या अर्थाने मिनीट्रेन सुरू झाल्यानंतरच बहरले होते. या ट्रेनमधून प्रवास करण्याकरिता देश-विदेशातून अनेक पर्यटक दाखल होत असतात. माथेरान मिनी ट्रेनचा इतिहास 1907 मध्ये सुरू झाला, जेव्हा नेरल आणि माथेरान दरम्यान ही हेरिटेज रेल्वे सुरू झाली. सर आदमजी पीरभॉय यांनी आपल्या मुलाच्या, अब्दुल हुसैन आदमजी पीरभॉय यांच्या मदतीने या 1904-1907 दरम्यान 16,00,000 रुपयांच्या खर्चाने बांधलेल्या रेल्वेमार्गाचे बांधकाम पूर्ण केले. ही रेल्वे माथेरानला जाण्यासाठी एकमेव रस्ता प्रदान करते, ज्यामुळे तिचे ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्व आहे. त्यांनी केलेल्या या कामाला हवा तसा सन्मान अजूनही माथेरानमधून मिळाला नसल्याची खंत यांचे नातू अली अकबर पिरबॉय हे सातत्याने करीत असतात. माथेरान स्थानकामध्ये त्यांचे लावलेले चित्र रेल्वे प्रशासनाकडून गहाळ झाल्यानंतर त्यांनी याबाबत संताप व्यक्त केला होता. परंतु, आता हे चित्र पुन्हा आपल्या स्थानी आल्यानंतर मात्र त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
आमच्या आजोबांनी माथेरान पर्यटन वाढविण्याकरिता मिनीट्रेनमार्फत दिलेल्या योगदानाला हवा तसा सन्मान अजूनही मिळाला नाही. माथेरान स्थानकामध्ये त्यांच्या नावाने एक स्मारक व्हावे अशी आम्ही सातत्याने मागणी करत असतो; परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
अली अकबर पिरभॉय







