17 आदिवासी बांधवांवर काळाचा घाला, छत्तीसगडमधील घटना
। छत्तीसगड । वृत्तसंस्था ।
छत्तीसगडमधील कावर्धा जिल्ह्यात सोमवारी (दि.20) पीकअप पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात 17 लोकांचा मृत्यू झाला, तर 10 ते 12 जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. आदिवासी बांधव जंगलातून पारंपारिक पानं घेऊन परतत होते. यावेळी हा अपघात झाला. पीकअपमधील सर्वजण कुई येथील राहिवासी असल्याची माहिती आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बहपानी भागात आला असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने पीकअप 20 फूट खोल दरीत कोसळली असल्याचे सांगण्यात येत आहे.
कावर्धा जिल्ह्यात भीषण अपघात घडल्यानंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांनी शोक व्यक्त केला. ट्वीटरवरुन त्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. विष्णूदेव साय यांनी लिहिले, कबीरधाम जिल्ह्यातील कुकदूर क्षेत्रात बाहपानी गावाजवळ पीकअप पलटी होऊन 17 ग्रामस्थांचा मृत्यू झाला. पीकमध्ये जवळपास 20 ते 25 लोक होते. तर 4 जण जखमी झाल्याची दु:खद घटना घडली. जखमींवर उपचार व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाला आदेश दिले आहेत. कावर्धा येथे कामगारांनी भरलेले पिकअप वाहन उलटल्याने 17 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत क्लेशदायक आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्या सर्व कुटुंबांसोबत माझ्या संवेदना व्यक्त करत आहे, असे छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा म्हणाले.