बाहेरून आणलेली माती सध्या चर्चेचा विषय; रॉयल्टीचे बुडविला जात असल्याचा ठपका
। नेरळ । प्रतिनिधी ।
मध्य रेल्वेच्या मुंबई- पुणे या मेन लाईन वरील भिवपुरी रोड ते कर्जत या मार्गावर मध्य रेल्वेकडून कारशेड उभारले जात आहेत. कारशेडसाठी सध्याच्या रेल्वे मार्गाच्या बाजूला 100 ते 150 मीटर एवढी जमीन रेल्वेकडून घेतली जात आहे. सध्या ज्या जमिनीवर कारशेड उभे राहणार आहे. त्या जमिनीवर किरवली, उमरोली, चिंचवली या 3 ग्रामपंचायत मधील शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत.
मध्य रेल्वेकडून कर्जत दिशेकडे आठ किलोमीटर भागात कारशेड उभे केले जाणार आहे. भिवपुरी रोड ते कर्जत या दरम्यान हे नवीन कारशेड उभारले जाणार आहे. नवीन रेल्वे कारशेड कामाला मागील काही दिवसांपासून गती मिळाली आहे. मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकण्याचे काम सुरु आहे. मात्र, हा मातीचा भराव भिसेगाव येथून उचलून आणण्यासाठी किरकोळ प्रमाणात रॉयल्टी भरली जात असल्याचे माहिती समोर येत आहे. दरम्यान, रॉयल्टी भरण्याचे तसदी मातीचा भराव टाकण्याचे काम मिळविणारा ठेकेदार घेतांना दिसत नाही. त्यामुळे शासनाचा महसूल बुडवण्याचा प्रकार महसूल विभाग रोखणार का? असा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहेत.
मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील कर्जत दिशेकडे रेल्वे कडून कारशेड उभारले जात आहे. मध्य रेल्वकडून 2021 मध्ये वसई विरार भागात कारशेड उभे राहिल्यानंतर कर्जत मार्गावर नवीन कारशेड उभारण्यास मंजुरी दिली आहे. मध्य रेल्वेवरील सर्वात मोठे कारशेड बनणार असून, साधारण सात ते आठ किलोमीटर अंतरावर हे नवीन कारशेड असणार आहे. या कारशेडचे कामाला सुरुवात झाली असून, मातीचा भराव टाकून जमीन सपाट करण्याचे काम केले जात आहे. मात्र, त्या कामासाठी बाहेरून आणली जाणारी माती सध्या चर्चेचा विषय बनली आहे. सध्या भिसेगाव भागातून माती आणली जात असून, दररोज शेकडो ब्रास माती तेथे टाकण्यात येत आहे. मात्र, बाहेरून उचलली जाणारी माती साठी शासनाच्या महसूल विभागाला स्वामित्व शुल्क म्हणजे रायल्टी भरावी लागते. परंतु, भिसेगाव येथील मातीच्या खोदकामाला जेमतेम रॉयल्टी महसूल विभागाला भरली असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडवून रेल्वेच्या कामासाठी मातीचा भराव टाकला जात आहे.
कारशेडसाठी दररोज माती घेऊन येणारे ट्रकसाठी खास रस्ता बनविण्यात आला आहे, त्याच रस्त्यासाठी काही शेकडो ब्रास माती लागली असेल. त्यामुळे भिसेगाव येथील जमिनीतून माती उचलण्यासाठी भरलेली रॉयल्टी ही त्याच रस्त्यासाठी संपल्याची कुणकुण स्थानकात सुरु आहे. तर दुसरीकडे दररोज हपणारी मातीची चाल यासाठी लागणारे रॉयल्टी संबधात कामाचे ठेकेदार कधी भरणार? असा सवाल स्थानिक शेतकरी विचारात आहेत. त्यामुळे रॉयल्टी चुकवून मातीचा होत असलेला भराव ही महसूल खात्यासाठी मोठी डोकेदुखी बनू शकते. त्यामुळे ही रॉयल्टी चुकवून सुरु असलेले वाहतूक महसूल विभाग रोखणार आहे काय? असा सवाल उपस्थित झाला आहे.
कळवा कारशेडचा भार होणार कमी
मध्य रेल्वेच्या कळवा कारशेड येथे असलेले कारशेड वर आलेला भार कमी करण्यासाठी 2011 मध्ये कारशेड बनविण्यात आले. त्यानंतर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील उपनगरीयच्या वाहतुकीस सुसुत्रता आणण्यासाठी कर्जत कारशेड बनविण्याचे रेल्वेकडून जाहिर करण्यात आले होते. त्यानुसार आता खऱ्या अर्थाने कर्जत कारशेडचे काम सुरु झाले आहे. या कारशेडसाठी कर्जत मार्गावरील भिवपुरी रोड स्थानकाच्या पुढे असलेल्या डिकसळ गावातून सुरु होणारे कारशेड कर्जत येथे दहा किलोमीटर या भागात हे कारशेड उभारले जाणार आहे.







