कापडे बुद्रुक येथे यात्रोत्सव

| पोलादपूर | वार्ताहर |

पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक येथील श्रीवरदायिनी मंदिराचा यात्रोत्सव मंगळवारी (दि.27)आयोजित करण्यात आला आहे. पोलादपूर तालुक्यातील अनेक ठिकाणचे हजारो देवीभक्त याप्रसंगी आवर्जून उपस्थित राहतात. श्रीवरदायिनी देवीचा वार मंगळवार असताना यंदाची यात्रादेखील मंगळवारी भरत असल्याने आज भक्तांची मांदियाळी मोठया प्रमाणात दर्शनाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक येथील श्रीवरदायिनी देवीच्या यात्राउत्सवाला आकाशपाळणे, छोटीमोठी खेळण्यांची दुकाने, मिठाईची दुकाने तसेच करमणुकीचे खेळ मोठया प्रमाणात असल्याने भाविकांना देवीच्या दर्शनासोबतच पैसा खर्च करून आनंद मिळविण्याची संधी अनेक प्रकारे प्राप्त होत असते. रात्री उशिरा यात्रेमध्ये तमाशाचे आयोजन केले जात असून तालुक्यातील पारंपरिक नृत्याचे शौकीनही यावेळी गर्दी करीत असतात.

कापडे बुद्रुक ग्रुपग्रामपंचायतीतर्फे या यात्रोत्सवासाठी विविध सोयी सुविधांचे आयोजन केले जात असून पोलादपूर पोलीसांचा यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून कडेकोट बंदोबस्त असतो. सातारा जिल्ह्यातील पार तथा पार्वतीपूर येथील श्रीरामवरदायिनी देवीनंतर पोलादपूर तालुक्यातील श्रीवरदायिनी देवी कापडे बुद्रुक येथे असून काटेतळी येथे श्रीरामवरदायिनी आहे. याबाबत ‘समर्थ रामदास स्वामींनी तुळजापुरी ठाकेना| चाललि पश्चिमेकडे| रामवरदायिनी माता| गर्द होऊनी उठली|’ असे भाष्य केले असून तुळजापूर, पार, कापडे बुद्रुक आणि काटेतळी या सर्व देवींची स्थाने प्रत्येकीच्या पश्चिमेकडे असल्याचा योगायोग आहे.

Exit mobile version