| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
शनिवारपासून प्रचंड संख्यने पर्यटक दाखल झाले आहेत. मुरूड, काशीद, बारशिव, नांदगाव येथील रेस्ट हाऊस, लॉजिंग व्यवस्था फुल्ल झाली . असल्याची माहिती साई गौरी रेस्ट हाऊसचे मालक आणि रायगड जिल्हा मच्छिमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी दिली. पर्यटकांच्या सेवेसाठी सर्वत्र अभूतपूर्व सज्जता असल्याचे सांगण्यात आले.
मुरूड तालुक्यातील राजपुरी जेट्टी, कोळीवाडा आणि वाळूवर जागोजागी पार्किंग फुल्ल झालेले आहे. खोरा जेट्टीवरदेखील वाहने दिसून येत आहेत. रविवारी तर पर्यटकांची विक्रमी हजेरी दिसून आली. त्यामुळे घरगुती खानावळी, पर्यटन व्यावसायिकांनादेखील सुगीचे दिवस आले आहेत. जंजिरा जलदुर्ग पाहण्यासाठी शनिवारी सकाळी 25 बसेसमधून शालेय सहलीचे विद्यार्थी दाखल झाल्याची माहिती जंजिरा जलदुर्गाचे अलिबाग-मुरूड येथील पुरातत्व खात्याचे अधिकारी बजरंग येलीकर यांनी दिली.
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील रहिवासी धनश्री अभय गंद्रे यांनी सांगितले की, दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर परिसरात हजारोंच्या संख्यने पर्यटक येत आहेत. परिसरातील समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. जंजिर्यात जाण्यासाठी दिघी जेट्टीवरदेखील पर्यटकांची मोठी हजेरी दिसून आली. सर्व किनार्यांवर सुरक्षितता म्हणून पोलीस यंत्रणा अधिक दक्ष ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. तीनही तालुक्यांच्या किनार्यावर हजारोंच्या संख्यने पर्यटक डेरेदाखल होताना दिसत आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठीदेखील प्रचंड संख्येने पर्यटक येतील, अशी माहिती पर्यटन व्यावसायिकांनी दिली.