पारा गेला सात अंशावर
। नेरळ । प्रतिनिधी ।
सतत येणारी वादळे आणि त्यामुळे बदलत असलेले हवामान यामुळे माथेरान या गुलाबी थंडीच्या पर्यटन स्थळी आतापर्यंतचे सर्वात नीचांकी तापमान नोंदवले गेले. माथेरानमध्ये पारा सात अंशावर आले असून माथेरान मध्ये जशी हुडहुडी भरली आहे तशीच हुडहुडी कर्जत तालुक्यात देखील पारा 15 अंशापर्यंत खाली आल्याने या थंडीमुळे जानेवारीच्या अखेरीस आनंदी वातावरण आहे.
2400 फुटावर असलेल्या माथेरान मध्ये गेल्या काही वर्षात सुरु असलेल्या वृक्ष लागवडमुळे सातत्याने गुलाबी थंडी मध्ये वाढ होत आहे. यावर्षी देशातील अनेक भागात हवामान बदलामुळे वादळे आली. तरी माथेरान मधील गुलाबी थंडी सर्वांना आकर्षित करीत आहे. माथेरान मध्ये तापमानाची नोंद घेणार्या पालिकेच्या यंत्रणेने 10 जानेवारी रोजी नोंदलेले तापमान हे आतापर्यंतच्या हवामानातील सर्वात कमी तापमान होते. त्या दिवशी 10 अंशावर तापमान खाली आले होते. मात्र गेल्या काही दिवसात राज्यात सुरु असलेल्या यावेळी पावसामुळे तापमान आणखी खाली आले होते आणि 23 जानेवारी रोजी माथेरानचा पारा चक्क सात अंशावर आला आहे. त्यामुळे रविवारी प्रचंड हुडहुडी माथेरानकरांनी अनुभवली. मात्र माथेरान हे पर्यटन स्थळ हिवाळ्यातील गुलाबी थंडीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे हिवाळ्यात थंडीचा आस्वाद घेण्यासाठी देशभरातून पर्यटक येत असतात. माथेरानची गुलाबी थंडी आणि पर्यटक हे समीकरण समजले जाते. मात्र कोरोनामुळे आलेल्या निर्बंधामुळे माथेरान मध्ये पर्यटकांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे सात अंश खाली आलेले तापमान याचा अनुभव घ्यायला पर्यटक यांची संख्या कमी आहे. परंतु माथेरानमध्ये झाडे तोडण्यास बंदी असल्याने माथेरानकरांना या थंडीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी शेकोटी देखील पेटवता येत नाही आणि त्यामुळे सूर्य डोक्यावर येईपर्यंत घरातच थंडीपासून बचाव करण्यासाठी थांबून राहावे लागत आहे.
औद्यगिकरण नसलेल्या आणि प्रदूषण मुक्त वातावरण यामुळे कर्जत तालुका मागील पर्यटन तालुका समजला जातो. या तालुक्यात पर्यटन मोठ्या असलेल्या रिसॉर्ट वर पर्यटनासाठी येत असतात. त्यामुळे 23 जानेवारी रोजी असलेल्या गुलाबी थंडीचा अनुभव घेतला. कर्जत तालुक्यात 15 ते 17 अंशापर्यंत तापमान आले होते. खाली आलेला पारा हा सकाळी मॉर्निंग वॉकसाठी निघणार्या स्थानिकांसाठी मागील काही दिवस हि सकाळ प्लेझंट होत आहे.







