पिरवाडी समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम

| उरण | वार्ताहर |

कोकण ज्ञानपीठ उरण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने उरण पिरवाडी समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी समुद्रकिनाऱ्यावरील संपूर्ण स्वच्छता करत महात्मा गांधी यांना अभिवादन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य के. शामा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या उपक्रमात वीर वाजेकर महाविद्यालयातील एनएसएस प्रमुख दिंधले यांनी प्रास्ताविकात गांधीजींच्या जीवनातील स्वच्छतेचे महत्व विद्यार्थ्यांसमोर विशद केले. गोसावी यांनी महात्मा गांधीजींच्या जीवनातून आपण सर्वांनी आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन केले. तर रायगड जिल्हा विभागीय समन्वयक डॉ. दत्ता हिंगमिरे यांनी प्रत्येकाने स्वच्छतेचा वसा घ्यावा, स्वच्छतेची सुरुवात आपल्यापासून करावी व तीच खरी देशभक्ती असल्याचे सांगितले. यावेळी योगेश कुलकर्णी, इतर मान्यवर व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थ्यां मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version