वसगाव पेट्रोल पंपासमोर खड्डेच खड्डे

। सुतारवाडी । वार्ताहर ।
वरसगाव पेट्रोल पंपासमोरच पहिल्याच पावसात अनेक खड्ड्यांनी रिंगण केल्यामुळे येथून जाणार्‍या – येणार्‍या वाहन चालकांना जागीच थांबून खड्ड्यातून मार्ग काढावा लागत आहे. या बाबत ही समस्या वृत्तपत्रांनी संबंधित खात्याच्या निदर्शनास आणून देखील येथील खड्डे न बुजवता प्रवासी व वाहतूक करणार्‍यांच्या जीवाशी हे खाते खेळत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांनी रिंगण केले असून चारचाकी सह दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना मोठी कसरत करावी लागत असल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

रात्रीच्या वेळी वाहन चालकांना येथील खड्डे दिसत नाहीत. मुंबई – गोवा महामार्ग असल्यामुळे वाहन वेगात जात असतात त्यामुळे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. दुचाकी वाहन चालकाला तर पाय जमिनीला टेकावे लागत असून मोठ्या शिताफिने रात्रीच्या वेळी भर पावसात मार्ग काढावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने प्रवाशांच्या अपघाताची वाट न पाहता त्वरित खड्डे भरून होणारा धोका टाळावा अशी मागणी नागरिकांची आहे.

Exit mobile version