काडवली-निरबाडे मार्गावरील खड्डे अपघाताला आमंत्रण


चिपळूण । प्रतिनिधी ।
काडवली (खेड) व निरबाडे (चिपळूण) या दोन गावांना जोडणार्‍या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असून वाहन चालकांना अंदाज येत नसल्याने अपघात होत आहेत. तरी या विषयाकडे संबंधित प्रशासनाने लक्ष द्यावे,अशी मागणी होत आहे.

खेड तालुक्यातील काडवलीकडे जाण्यासाठी निरबाडे हा जवळचा मार्ग आहे. या दरम्यान नदी वाहत असून 26 जुलै 2005 च्या अतिवृष्टीत या नदीवरील कोजवे वाहून गेल्याने या पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा एकमेकांशी संपर्क तुटला.तर काडवली येथून निरबाडे शाळेमध्ये जाणार्‍या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ लागली. या विद्यार्थ्यांना आंबडसमार्गे पालीफाट्यावरून शाळेला जावे लागत असे. हा मार्ग लांबचा असल्याने पालक व ग्रामस्थांमधून दोन गावांना जोडणार्‍या नदीवर पूल बांधण्यात यावा,अशी मागणी होती. याची दखल घेऊन शासनाने या पुलाच्या बांधकामासाठी निधी मंजूर करून काही महिन्यातच काडवली-निरबाडे या दोन्ही गावांना जोडणार्‍या नदीवर पूल बांधण्यात आला. मात्र, या पुलावरील काँक्रीट निघून गेल्याने खड्डे पडले असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. पर्यायाने वाहन वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने किरकोळ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यामुळे या वरील खड्डे भरण्याच्या दृष्टीने संबंधित विभागाने योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी होत आहे. अन्यथा पावसाळ्यात मोठा अपघात झाल्यास जबाबदार कोण ? असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.

Exit mobile version