कोलाड नाक्यावरील खड्डे की रिंगण

। सुतारवाडी । वार्ताहर ।
कोलाड नाक्यावर असलेले मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक खड्डे जणू एखाद्या चित्रकाराने रेखाटलेले सुंदर रिंगणच असल्याचा भास अनेक प्रवाशांना होत आहे. दीड आणि पाच दिवसांच्या गणपतींचे आगमन आणि विसर्जनही या खड्डेमय प्रवासातून झाले. येथे गतिरोधकाची आवश्यकता नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. कारण, अनेक खड्डे पाहून वाहनांना थोड्या अंतरावरुनच वेगावर नियंत्रण राहते. वास्तविक, हा मुंबई-गोवा महामार्ग आहे. या मार्गावरून रात्रंदिवस लहान-मोठ्या अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. कोलाड नाका अगदी केंद्रबिंदू आहे. केंद्रबिंदू वरच अनेक खड्ड्यांचे वलय विखुरलेल्या अवस्थेत असल्यामुळे अनेकांचे लक्ष तिकडे जाते. या नाक्यावरून रोह्याकडे जाण्यासाठी मार्ग आहे. तसेच मुंबई-गोवा मार्गाकडे जाण्यासाठी मध्यवर्ती ठिकाण असून, समोर पोलीस चौकी तसेच रस्त्याच्या दुतर्फा अनेक लहान-मोठी दुकानंही आहेत. कोलाड नाक्यावर आल्यानंतर दूचाकी आणि चारचाकी वाहनांना मार्गक्रमण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असते. वास्तविक, वेळोवेळी येथील खड्डे भरणे आवश्यक असतानाही याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष देत नाही, त्यामुळे प्रवाशांना सण असो वा नसो, खड्डेमय प्रवास करावा लागतो.

Exit mobile version