नवीन स्वागत कमान बांधण्याचा घाट

शासनाच्या निधीचा अपव्यय सुरू असल्याची चर्चा

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याचे दिसून येत आहे. गणेशघाट असलेल्या ठिकाणी गेल्या काही वर्षांपासून स्वागत कमान उभी आहे, मात्र ती स्वागत कमान सुस्थितीत असताना नव्याने स्वागत कमान बांधण्यात येत आहे. दरम्यान, शासनाच्या निधीचा अपव्यय सुरु असल्याने नेरळ गावातील या ग्रामस्थ त्या निधीबाबत चर्चा करू लागले आहेत.

नेरळ ग्रामपंचायतीकडून ब्रिटिशकालीन धरणावर गणेश घाट 1995 मध्ये बांधण्यात आला. त्यांनतर त्या ठिकाणी गणेश विसर्जन सोहळे रंगू लागले. त्या ठिकाणी त्या सोहळ्यासाठी जमीन कमी पडू लागल्याने नेरळ ग्रामपंचायतीने त्या ठिकाणी असलेली दळवी कुटुंबीयांची जमीन ग्रामपंचायत साठी मागितली आणि दळवी कुटुंबाने मोठ्या औदार्याने ती जमीन नेरळ ग्रामपंचायतला दान केली असून, त्या जमिनीवर अनाजी दळवी पार्क उभारण्यात आले होते. दळवी पार्कचे बाजूला असलेल्या गणेश घाट ठिकाणी नव्याने स्वागत कमान बांधण्यास सुरुवात झाली आहे. त्या ठिकाणी 15 वर्षांपासून स्वागत कमान असून, नव्याने स्वागत कमान बांधण्याची गरज काय आणि कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

जुन्या स्वागत कमानीच्या उभारणीसाठी लाखभर रुपये खर्च झालेले आहेत आणि ती स्वागत कमान सुस्थितीत असताना नवीन स्वागत कमान कशासाठी आणि कोणाच्या फायद्यासाठी बांधली जात आहे. असे अनेक प्रश्न नेरळ गावातील ग्रामस्थ समाज माध्यमांवर उपस्थितीत करीत आहेत. जुनी आणि सुस्थितीत असलेली स्वागत कमान याकडे त्या ठिकाणी नवीन स्वागत कमान बांधण्याचे अंदाजपत्रक करणाऱ्या अधिकाऱ्यांना दिसली नाही काय, असा सवालदेखील उपस्थितीत करण्यात आला आहे. त्यामुळे अधिकारीवर्गावर गरज नसताना शासनाचा निधी खर्च करण्याचा ठपका ठेवण्याची मागणीदेखील केली जात आहे.

Exit mobile version