| मुंबई | प्रतिनिधी |
कोचीहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइट -2744 चा सोमवारी (दि.21) सकाळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंगदरम्यान अपघात घडला. मुसळधार पावसात लँडिंग करताना विमानाने धावपट्टीवरून घसरत नियंत्रण गमावल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे लँडिंग करताना काही क्षणांतच विमानाने नियंत्रण गमावले आणि धावपट्टीवरून घसरले. या घटनेत विमानाचे तीन टायर फुटल्याचे उघड झाले असून, इंजिनचेही काही प्रमाणात नुकसान झाले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अपघाताची तीव्रता लक्षात घेता, वैमानिकाची सतर्कता आणि त्वरित प्रतिसादामुळे मोठा अनर्थ टळला आहे. विमान थेट टर्मिनल गेटपर्यंत सुरक्षितरित्या पोहोचले. सर्व प्रवासी सुखरूप असून, कोणालाही गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आलेली नाही.







