मान्सूनपूर्व कामांसंदर्भात नियोजन बैठक

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रांतील मान्सुन पूर्व कामांसंदर्भातील उपाययोजना व आपत्कालीन व्यवस्थापनाबाबतचे नियोजन याविषयांवरती बुधावारी (दि.17) रोजी आयुक्त गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी मान्सूनपूर्व कामांचा आढावा तसेच आपत्ती काळातील व्यवस्थापन या विषयांवरती चर्चा करण्यात आली.

यावेळी उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे, सहाय्य्क आयुक्त डॉ. वैभव विधाते, शहर अभियंता संजय जगताप, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, चारही प्रभागाचे प्रभाग अधिकारी, सिडको मुख्य अग्निशमन अधिक्षक विजय राणे, पोलीस निरीक्षक संजय नाळे, पोलीस निरीक्षक प्रमोद पवार, सिडकोचे कार्यकारी अधिकारी अनंत धोंडे, सिडकोचे कार्यकारी अभियंता विलास बनकर, परिवहन विभागाचे ज्ञानेश्वर म्हात्रे उपस्थित, पालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

महापालिकेच्यावतीने नाले सफाईची कामे लवकरात लवकर संपवावीत अशा सूचना आयुक्तांनी यावेळी संबधित विभागास दिल्या. तसेच पांडवकडा भाग पावसाळ्यात धोकादायक असतो. अनेकदा या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असते. याचा विचार करता पावसाळ्याच्या कालावधीत पांडवकडा भाग नागरिकांसाठी बंद ठेवण्याच्या दृष्टीने फलक लावण्याच्या सूचना बांधकाम विभागास दिल्या.

धूर फवारणी व जंतूनाशके फवारणी यंत्रणा सज्ज करण्याच्या सूचना घनकचरा आरोग्य विभागास दिल्या. कळंबोली होल्डींग पाँड येथील पाण्याचा निचरा होण्यासाठी पंपिग मशीनची व्यवस्था संबधित विभागाने करण्यास सांगितले. मान्सूनपूर्व करावयाची विद्युत विभागाची कामे, धोकादायक स्थितीत झाडांची, फांद्यांची छाटणी करणे, धोकादायक इमारतीची पाड कामे पूर्ण करण्याच्या सूचना बैठकित देण्यात आल्या. बैठकिस उपस्थित असलेल्या पालिकेच्या सर्व विभागांना यावेळी दिलेल्या सूचनांचे पालन करण्यात यावे असे आदेश आयुक्तांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले. तसेच शासनाच्या सर्व विभागांनी आपले नियंत्रण कक्ष्‌‍ कार्यान्वित करावेत. या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून आपत्कालीन परिस्थितीमध्ये महापालिकेला सहकार्य करावे अशी विनंती आयुक्तांनी केली.

Exit mobile version