कर्तृत्ववान महिलांच्या सत्काराचे नियोजन

| पोलादपूर | वार्ताहर |

तालुक्यातील विश्वकर्मा पंचाल सोनार समाजबांधवांतर्फे पोलादपूर शहरामध्ये प्रथमच संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा (दि.27) फेब्रुवारी श्रीदेवी गंगामाता सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी सोनार समाजात अन्य समाजामधून विवाहबध्द होऊन आलेल्या कर्तृत्ववान महिलांच्या सत्काराचे नियोजन करण्यात आले असून सोनार समाजातील महिलांचादेखील यामध्ये समावेश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाड तालुक्यातील चोचिंदे येथे संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळयाला उपस्थिती दर्शविणाऱ्या पोलादपूर येथील पंचाल सोनार समाजबांधवांनी यंदा प्रथमच पोलादपूर तालुक्यामध्ये या सोहळयाचे आयोजन केले आहे. महाड तालुक्यातील चोचिंदे येथील समाजमंदिरामध्ये पूरस्थितीमध्ये पाणी जाऊन मंदिराचे नुकसान होत असल्याने जिर्णोध्दाराची तयारी करून आर्थिक नियोजनासाठी पोलादपूर तालुक्यातील समाजबांधवांना गृहित धरण्यात आले. मात्र, गेली अनेक वर्षे चोचिंदे येथे मिरविणाऱ्या पोलादपूर येथील समाजबांधवांनी यावर्षीपासून फारकत घेतली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

विश्वकर्मा पांचाल सुवर्णकार युवा मंचचे अध्यक्ष संदीप पालकर आणि सुवर्णकार संघटना अध्यक्ष दीपक पालकर यांच्या प्रमुखत्वाखाली यंदाच्या संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळयाचे आयोजन श्रीदेवी गंगामाता सभागृहामध्ये मंगळवार दि. 27 फेब्रुवारी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत करण्यात आले असून विश्वकर्मा सुवर्णकार पंचाल महिला मंडळाच्या मुंबई अध्यक्ष अनिता सागवेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सकाळी संत नरहरी महाराजांच्या मुर्तीला अभिषेक, ध्वजारोहण, दिंडी, प्रवचन, पुष्पवृष्टी व आरती, महाप्रसाद आणि दुपारच्या सत्रात कर्तृत्ववान महिलांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी समाजातील प्रमुख उपस्थिती म्हणून निमंत्रितांच्या पत्रिकेतील यादीपैकी पाच ते सात निमंत्रितांना व्यासपिठावर बसविणार येणार असून युवामंच कमिटी आणि महिला मंडळ तसेच अन्य समाजबांधवांची यावेळी उपस्थिती राहणार आहे.

Exit mobile version