वृक्षारोपण आणि संवर्धन ही नैतिक जबाबदारी

। माथेरान । वार्ताहर ।

माथेरानमध्येसुध्दा यावर्षी उन्हाच्या झळा सोसाव्या लागल्या आहेत. त्यासाठी वृक्षारोपण आणि त्यांचे संवर्धन ही काळाची गरज निर्माण झाली असून आम्ही यांचे संगोपन करणार आहोतच. परंतु सर्व नागरिकांनीसुध्दा आपल्या परिसरात एक तरी झाड जगविणे गरजेचे असून आपली नैतिक जबाबदारी असल्याचे मत वन क्षेत्रपाल उमेश जंगम यांनी व्यक्त केले.

क्षत्रिय मराठा समाज आणि संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव, मंगेश सकपाळ, प्रवीण सकपाळ, अनंत शेलार, गिरीश पवार, विजय कदम,सुनील शिंदे, रिक्षा संघटना अध्यक्ष शकील पटेल, प्रकाश सुतार, वनपाल राजकुमार आडे, वनसमिती अध्यक्ष योगेश जाधव, महिला अध्यक्षा प्रतिभा घावरे, बिना कदम, वर्षा शिंदे, विनंती घावरे, सुहासिनी शिंदे, सोनम दाभेकर, श्रुतिका दाभेकर, हेमलता कदम, नगरपरिषदेचे कार्यालय अधीक्षक अंकुश इचके, सदानंद इंगळे, प्रवीण सुर्वे यांसह अन्य उपस्थित होते.

वनखात्याने वृक्षारोपण निमित्ताने विविध फळाफुलांची काही प्रमाणात रोपे मागविली आहेत. त्यातील काही रोपे निसर्ग पर्यटन संस्थेच्या माध्यमातून तर काही इंदिरा गांधी नगर भागातील तरुणांनी विविध ठिकाणी रोपे लावली आहेत. काही वृक्ष प्रेमींनी सुध्दा फॉरेस्ट कार्यालयातून ही रोपे लागवड केली आहे.मुख्य रस्त्यावर लावण्यात आलेल्या रोपांच्या संरक्षणार्थ वन समिती मार्फत ट्री गार्ड लावले जाणार आहेत.

माथेरानची वनराई बहरली तरच इथले पर्यटन बहरेल. पूर्वीचे हवामान आणि सद्यस्थितीत हवामानात जो काही बदल झाला आहे तो पर्यटनाच्यादृष्टीने काळजी करणारा आहे. वनसंपदा राहिली तरच इथे पर्यटक येतील आणि सर्वाना उपजीविकेचे साधन प्राप्त होऊ शकते. त्यासाठी लहान मुलांप्रमाणे या रोपांची जोपासना केल्यास नक्कीच इथे हरितक्रांती घडेल.

चंद्रकांत जाधव, अध्यक्ष क्षत्रिय मराठा समाज माथेरान
Exit mobile version