| सुकेळी | वार्ताहर |
प्रदूषणाच्या समस्येने सर्वत्र उग्र रुप धारण केलेले असून, पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक झाले आहे. यासंबंधी समाजाला जागृत करण्यासाठी व समाजामध्ये वृक्षारोपण व संवर्धनासाठी जनजागृती करण्यासाठी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार पाटणसई येथील मोरया होम टाऊनच्या परिसरामध्ये रविवारी (दि.16) वृक्षारोपण करण्यात आले.
दिवसेंदिवस पर्यावरणाचा र्हास होत चालला आहे. त्यामुळे वातावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन करणे, ही काळाची गरज झाली आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्याच्या सुरुवातीलाच व जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत नागोठणेजवळच असलेल्या पाटणसई येथील मोरया होम टाऊन येथील रहिवाशांनी मोरया टाऊनच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या झाडांची लागवड करुन सर्वांना वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. यावेळी वृक्षारोपणसाठी सोसायटीमधील विश्वास गायकर, सुनील थळे, स्वप्निल जांबेकर, चेतन जाधव, आराधना गायकर, रिया जांबेकर, वैशाली गायकवाड, स्नेहा थळे, सविता जाधव आदी रहिवासी उपस्थित होते.