जिजामाता शिक्षण संस्थेत वृक्षारोपण

| म्हसळा | वार्ताहर |

दिवसेंदिवस उष्णतेची लाट आणि सध्याचा ग्लोबल वॉर्मिंगचा इशारा पाहता निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे वृक्ष लागवड काळाची गरज बनली आहे. जमिनीमध्ये पाण्याचे प्रमाण कमी झाले असल्याने त्याचे संतुलन राखण्यासाठी जास्तीत जास्त वृक्षलागवड केली पाहिजे, या स्तुत्य हेतूने रायगडभूषण कृष्णा महाडिक यांच्या प्रयत्नाने पंजाब येथील दानशूर उद्योगपती विजय नागरथ, जिजामाता शिक्षण संस्थाप्रमुख महादेवराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिजामाता शिक्षण संस्थेच्या प्रांगणात वृक्षलागवड करण्यात आली.

या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी कृष्णा महाडिक यांनी शाळा शिक्षक आणि विद्यार्थी वर्गाने योग्य ती काळजी घेऊन निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी मोलाचे सहकार्य करावे, असे आवाहन केले. आयोजित वृक्षलागवड कार्यक्रमाला मुख्याध्यापक संदीप कांबळेकर, बनोटी प्राथमिक शाळा मुख्याध्यापक जयसिंग बेटकर, मेंदडी हायस्कूल मुख्याध्यापक प्रमोद चालके, रुपेश कांबळे, मेघशाम लोणशिकर, वैभव सुतार, भावेश घाणेकर, लक्ष्मण गाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

गावागावात जसे देवालय बांधले जातात, तशीच सर्वत्र विद्यालये बांधली पाहिजे, तरच ज्ञानात भर आणि देशाची प्रगती होईल, या विचाराने प्रेरित होऊन सहा महिन्यांपूर्वी कृष्णा महाडिक यांच्या प्रयत्नाने विजय नागरथ यांच्यासारख्या अनेक मान्यवरांच्या आर्थिक सहकार्याने जिजामाता शिक्षण संस्थेला शैक्षणिक साहित्यासह सर्व सुखसोयीनिशी सुबक इमारतीची उभारणी करून मोलाचे योगदान व सहकार्य केले आहे. त्याबद्दल संस्थाप्रमुख माजी सभापती महादेव पाटील यांनी मनोमन आभार मानले आणि मान्यवरांचे स्वागत केले.

Exit mobile version