। रसायनी । वार्ताहर ।
तालुक्यातील कांढरोली या गावी नदीकिनारी सुमारे 400 बांबू व आवळा,वड झाडांची लागवड करण्यात आली. पनवेल खांदा कॉलनी येथील सेक्टर बारामधील संकल्प एकता मंच यांच्या वतीने खालापूर तालुक्यातील चौक कांढरोली गावच्या हद्दीतील नदीकिनारी सुमारे 400 बांबू व आवळा झाडांची लागवड केली. सध्या नदीकिनारी बांधकाम केले जाते. मोठ्या पावसात नदी नाले भरून वाहून जातात. त्यातच माती चोरीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नदी-नाले यांच्या काठाची धूप होते. त्यामुळे नदी काठच्या शेतात पुराचे पाणी शिरून शेतकर्यांचे मोठे नुकसान होते.
या परीसरात बांधकाम जास्त प्रमाणात होताना दिसत आहे. मात्र येथे विकसित करणारे झाडे लावणे अगर त्यांचे संगोपन करताना दिसत नाहीत. जमिनीची धूप आणि नदी काठच्या मातीची धूप होऊ नये यासाठी बांबूची लागवड करण्यात येत असून शहरात राहताना आणि कोरोना काळात ऑक्सिजनची गरज आम्हाला आजही आठवते. यासाठी आवळा या औषधी झाडांची, वड पिंपळ यांच्यासारख्या ऑक्सिजन देणार्या झाडांची लागवड कांढरोली ग्रामस्थांच्या सहकार्याने करीत असल्याचे संकल्प एकता मंचच्या पदाधिकार्यांनी सांगितले. ही झाडे जगविण्याचादेखील संकल्प असून आम्ही झाडे दत्तक घेतली आहेत, असेही त्यांनी सांगितले.