डोंगरी-राजपुरी रस्त्यावर दुतर्फा वृक्षांची लागवड

| आगरदांडा | प्रतिनिधी |

जय श्रीराम नागरी पतसंस्था, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पर्यावरण विभाग व एकदरा युवक यांचे संयुक्त विद्यमाने मुरूड नजिकच्या जंजिऱ्याकडे जाणाऱ्या डोंगरी राजपुरी रस्त्याच्या दुतर्फा सुमारे दीड कि.मी. परिसरात हेद, जांभुळ, बोर, बहावा, करंज, आवळा, शिशव आदी विविध प्रकारचे 100 झाडे लावण्यात आली. रायगड जिल्हा रा.स्व. संघ पर्यावरण विभागप्रमुख महेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 40 स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे या वृक्षारोपण मोहिमेत सहभाग घेतला.

मानवाने भौतिक सुखाच्या प्राप्तीसाठी निसर्गाचे शोषण टाळले पाहिजे. वायू, पाणी, अग्नी, आकाश व जमीन या तत्त्वांवर मानवी जीवन अवलंबून असल्याने पर्यावरणाचे संतुलन राखले पाहिजे, या अनुषंगाने झाड, पाणी आणि प्लास्टिक या विषयांवर भरीव काम मुरुड तालुक्यात उभे करणार असल्याचे पाटील यांनी युवकांना संबोधित करताना सांगितले.

येत्या 17 सप्टेंबरला जागतिक स्वच्छतादिनी समुद्रकिनारे स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. वृक्षलागवड मोहिमेत शिवम मकू (एकदरा), प्रा. अनुपसिंह, श्रीराम पत संस्थेचे सरव्यवस्थापक संजय ठाकर, निकेतन मसाल, मधुकर वाघरे, प्रकाश पाटील आदी सहभागी झाले होते.

Exit mobile version