जोगवाडी ग्रामस्थांनी लावली दोन हजार झाडे
| तळा | वार्ताहर |
तळा शहरातील ऐतिहासिक तळगड किल्ल्यावर रविवारी जोगवाडी ग्रामस्थांकडून वृक्षारोपण करण्यात आले. किल्ल्यावर झाडांची संख्या वाढावी, या उद्देशातून याठिकाणी विविध प्रकारची झाडे लावण्यात आली.
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या तळा शहरातील तळगड किल्ला हा एवढ्या वर्षांनंतरही मजबूत स्थितीत असला तरी नैसर्गिक आपत्तीमुळे किल्ल्याचा काही भाग ढासळू लागला आहे. निसर्ग चक्रीवादळात किल्ल्यावरील बहुतांश झाडे ही वेगाने वाहणार्या वार्यांमुळे तुटून पडली होती व यामुळेच यावर्षी पहिल्याच पावसात किल्ल्यावरील दोन मोठे दगड जोगवाडी गावात कोसळल्याने दोन घरांचे मोठे नुकसान झाले होते व या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली होती.
किल्ल्यावर झाडांची संख्या वाढण्याची नितांत आवश्यकता आहे. कारण, झाडांच्या मुलात माती घट्ट धरून ठेवण्याची क्षमता असते. यामुळेच किल्ल्याला मजबुती येऊन दगड व दरड कोसळण्याचा धोका कमी होतो. त्याअनुषंगाने जोगवाडी ग्रामस्थांकडून तळगड किल्ल्यावर दोन हजार झाडांची लागवड करण्यात आली. त्याचे संगोपन करण्याचा निर्धारही नागरिकांकडून करण्यात आला. याप्रसंगी तहसीलदार ए.एम. कनशेट्टी, नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, नगरपंचायतीचे नगरसेवक तसेच जोगवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.