महापालिका क्षेत्रात प्लास्टिक बंदीचा फज्जा

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आता प्लास्टिकचा मुक्त वापर सुरू झाला आहे. यात सर्वाधिक वापर फेरीवाल्यांकडून होत असून स्वीट मार्टपासून किरकोळ विक्रेते प्लास्टिकमध्ये वस्तू देत आहेत. त्यामुळे कचऱ्यातून गायब झालेले प्लास्टिक पुन्हा दिसू लागल्याने नवी मुंबई प्लास्टिक बंदीचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.

राज्यात प्लास्टिक आणि थॅर्माकॉलच्या वस्तूंवर बंदी घातल्याची अधिसूचना मे 2018 मध्ये राज्यसरकारकडून काढण्यात आली. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेला कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले गेले होते. त्यामुळे महापालिकेकडूनही प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर काटेकोरपणे कारवाई करण्यात येत होती. आजही महापालिका विविध ठिकाणी प्लास्टिक वापरावर कारवाई करत आहे. मात्र, तरीही पिशव्यांचा वापर सर्रासपणे होत असल्याचे दिसत आहे. शहरातील मंडईंमध्ये भाजी-विक्रेत्यांबरोबर फेरीवाल्यांकडूनही बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर केला जात आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदीच्या निर्णयाच्या काटेकोर अंमलबजावणीत महापालिका अपयशी ठरली आहे.

नियमित कारवाईनंतर अपयश
राज्य सरकारने प्लास्टिक बंदी लागू करून पाच वर्षांचा कालावधी झाला तरी नवी मुंबईत काही ठिकाणी चोरट्या, तर काही ठिकाणी खुलेआम प्लास्टिक वापर सुरू आहे. नियमित होणाऱ्या कारवाईवरूनच हे दिसून येते. प्लास्टिक बंदीची घोषणा झाल्यानंतर पालिका क्षेत्रात काही दिवस कडक अंमलबजावणी झाली होती. सरकारने 50 मायक्रॉनवरील प्लास्टिक पिशव्यांना काही अटींवर परवानगी दिली; पण याचा चुकीचा अर्थ लावत व्यापारी, विक्रेत्यांनी बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री-सुरू केली आहे.
Exit mobile version