१ जुलै पासून प्लास्टिक बंदी

मुंबई । वृत्तसंस्था ।
एकदाच वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात 1 जुलैपासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने प्लास्टिकच्या पिशव्या, ताटे, वाटया, ग्लास, काटे, चमचे, अन्नपदार्थ, मिठाई यांच्या पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणार्‍या प्लास्टिकचा समावेश आहे.
केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार राज्यात एकदाच वापरल्या जाणार्‍या प्लास्टिक वस्तूंवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. प्लास्टिकपासून निर्माण होणार्‍या अविघटनशील कचर्‍याचा सागरी व वन्यजीव तसेच मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो़ प्लास्टिक कचरा शहरांमधील नाले, गटारात अडकून राहिल्याने अनेकदा पूरपरिस्थती निर्माण झाली आह़े त्याला पायबंद घालण्यासाठी राज्य सरकारने 2006 मध्ये प्लास्टिक बंदीचा कायदा केला.
या संदर्भात केंद्रीय पर्यावरण, वने आणि वातावरणीय बदल मंत्रालयाने देशात एकदाच वापरल्या जाणार्‍या प्लास्टिक वस्तूंचे उत्पादन, साठा, वाहतूक, विक्री, आयात, वितरण व वापरावर बंदी घालण्यासंबंधी 21 ऑगस्ट 2021 रोजी एक अधिसूचना प्रसृत केली. राज्यात 1 जुलै 2022 पासून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्वंतत्र अधिसूचना काढली आहे. बंदी घालण्यात आलेल्या प्लास्टिक वस्तूंमध्ये सर्व प्रकारच्या पिशव्या (कॅरी बॅग्ज), ताटे, वाटया, ग्लास, काटे, चमचे, सुर्‍या, स्ट्रॉ, कानकाडया, हवाई फुग्यांसाठी वारण्यात येणार्‍या प्लास्टिकच्या काडया, प्लास्टिक ध्वज, मिठाईचे बॉक्स, निमंत्रण पत्रिका, सिगारेट पॅकेट्सच्या पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणार्‍या फिल्म, प्लास्टिक फलक, सजावटीसाठी वापरले जाणारे थर्माकोल इत्यादी वस्तूंचा समावेश आहे.

Exit mobile version