पालीमध्ये प्लास्टिक बंदी कागदावरच

नगरपंचायत हद्दीत सर्रास वापर
| सुधागड-पाली | वार्ताहर|

पर्यावरण संरक्षणासाठी व नागरिकांच्या आरोग्यावर होणारे घातक परिणाम रोखण्यासाठी शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला. परंतु प्लास्टिक बंदी कायद्याची अंमलबजावणी न केल्याने पाली शहरात प्लास्टिक कचर्‍याचे साम्राज्य पसरले आहे. याला नगरपंचायतीचा नाकर्तेपणा कारणीभूत असल्याचे सुजाण नागरिकांचे म्हणणे आहे.

बाजारपेठेत फेरफटका मारल्यास व्यापारी, भाजी-फळ विक्रेते सर्रासपणे प्लास्टिक पिशव्या ग्राहकांच्या माथी मारताना दिसतात. प्लास्टिक वापरावर बंदी संदर्भात दंड आकारण्याचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. परंतु ते अधिकार न वापरल्याने नगरपंचायतीची अवस्था म्हणजे दात नसलेल्या म्हाता-या सिंहासारखी झाली आहे. जागोजागी प्लास्टिक पिशवीतील कचरा भटक्या गाई, कुत्रे, घुशी यांना आमंत्रण देत आहे. भटक्या जनावरांची समस्या ही ब-याच अंशी कचराकुंडीत उपलब्ध असलेल्या खाद्यामुळेच निर्माण झाली आहे. प्लास्टिक खाल्याने भटक्या जनावरांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यावर वेळीच उपाय केले नाहीत तर भविष्यात प्लास्टिक कचरा उग्र रूप धारण करेल हे मात्र नक्की.

भाजी, फळे घेताना प्लास्टिकची पिशवी नाकारली व कागदाची पिशवी मागितली तर भाजी / फळ विक्रेते नागरिकांकडे कुत्सितपणे पाहतात. व्यापा-यांवर नगरपंचायतीचा धाक न राहिल्याने व्यापारी प्लास्टिक पिशवीबाबत ग्राहकांसोबत उद्धटपणे वागतात.


उदय मोरे ,स्वयंपूर्ण सुधागड कार्यकर्ते
Exit mobile version