माथेरानमध्ये प्लास्टिक बंदी कडक अंमलबजावणी करणार – सुरेखा भणगे

। नेरळ । वार्ताहर ।
केंद्रीय पर्यावरण वने व हवामान बदल मंत्रालयाने ऑगस्ट 2021 च्या अधिसूचित केलेल्या सुधारित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2021 नुसार एकल वापर (सिंगल यूज) प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिक वस्तूंवर बंदी आणली. या प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने माथेरान शहर आणि परिसर 2002पासून पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जाहीर केले आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदीचा निर्णय माथेरानसाठी नवीन नाही, मात्र त्या निर्णयाच्या अंमलबावणीबाबत माथेरान गिरीस्थान नगरपरिषद आक्रमक झाली आहे.
माथेरान हे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असल्याने येथे प्लास्टिकच्या वस्तू सर्रास वापरल्या जातात. या वस्तू आता माथेरानमधून हद्दपार होणार आहेत. शासन निर्णयानुसार 1 जुलै 2022 पासून सिंगल यूज प्लास्टिक वापरावर संपूर्ण देशात बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्याच्या हालचाली माथेरान नगरपालिकेत सुरू झाल्या आहेत. दरम्यान, सर्व दुकानदारांनी प्लास्टिक वस्तू न विकता त्या दुकानातसुद्धा ठेऊ नयेत, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

माथेरानमधील व्यापारी सुज्ञ आणि पर्यावरणस्नेही आहेत. त्यामुळे ते स्वतः या वस्तू ठेवणार नाहीत. व्यापारी मंडळाला तशा सूचनाही देऊन त्याची अंमलबजावणी सुरू करणार आहे.

सुरेखा भणगे, मुख्याधिकारी तथा प्रशासक, माथेरान

यावर बंदी…
याबरोबरच महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल अधिसूचना 2018 अंतर्गत कंपोस्टेबल प्लास्टिक, सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या तसेच हॅण्डल असलेल्या व नसलेल्या डिश, बाऊल व कंटेनर (डबे)सजावटीसाठी प्लास्टिक व पॉलिस्टीरीन (थर्माकोल ) मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड व प्लास्टिक आवरण असलेली सिगारेटची पाकिटे, प्लास्टिकच्या काड्यांसह कानकोरणी, फुग्यांसाठी प्लास्टिकच्या काड्या, प्लास्टिकचे झेंडे, कॅण्डी कांड्या, आईस्क्रीम कांड्या, प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी जसे काटे, चमचा, चाकू, पिण्यासाठी स्ट्रॉ, ट्रे, ढवळण्या (स्टिरर्स) 100 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे पीव्हीसी बॅनर्स यावरही बंदी घालण्यात आली आहे.

असे आहे दंडाचे स्वरूप
नागरिकांकरिता दंडाची रक्कम 500 रुपये असेल, तर दुकानदार फळ, भाजीविक्रेते, व्यापार्‍यांकरिता पहिल्या गुन्ह्यास 5 हजार, दुसर्‍या गुन्ह्यास 10 हजार आणि तिसर्‍या गुन्ह्यास 25 हजार व तीन महिन्यांचा कारावास, असे दंड असणार आहेत.

Exit mobile version