कॅफे बिग ब्ल्यू मारबलमध्ये प्लास्टिकचा पुनर्वापर

पाली/बेणसे । वार्ताहर ।
पालीतील कॅफे बिग ब्ल्यू मारबलमध्ये प्लास्टिकचा अविघटनशील कचरा पुनर्वापर करण्यासाठी पाठविला जात आहे. शिवाय येथील बहुतांश वस्तू या पर्यावरण पूरक असून विघटनशील आहेत. येथील कचर्‍याचा वापर खत बनविण्यासाठी केला जातो. या सर्व उपक्रमामुळे हे कॅफे सुधागडातील एकमेव झिरो वेस्ट कॅफे ठरले आहे. येथे कोल्ड कॉफी किंवा अन्य गोष्टींसाठी लागणार्‍या दुधाच्या पिशव्या साठवून त्या धुवून स्वच्छ केल्या जातात. त्यानंतर या हजारो पिशव्या पुनर्वापरासाठी मुंबईत पाठवल्या जातात. झीरो वेस्ट कॅफे म्हणून येथील कर्मचारी सुद्धा या कामात उस्फुर्त सहभाग घेत आहेत. यामध्ये कॅफेच्या संचालिका सुरभी मोरे यांच्यासह कर्मचारी दर्शना शिंदे आणि हर्षदा गोळे या दोघी देखील प्लास्टिक टाळण्यासाठी मोठा हातभार लावत आहेत. अशा प्रकारे कोणी प्लास्टिक आणून दिल्यास ते पुनर्वापरासाठी निशुल्क पाठविले जाईल असे सुरभी मोरे यांनी सांगितले.

जीवनाचा असा कोणताही भाग नसेल जेथे प्लास्टिक वापरले जात नाही. प्लास्टिक आणि त्याच्या उत्पादनांनी आपले जीवन सुकर केले तसेच पॅकिंग उद्योगांना नवीन परिभाषा दिली आहे. परंतु काळानुसार हे वरदान हळूहळू आपल्या जीवनातील शाप बनू लागलं आहे. त्यामुळे रोजच्या वापरातील प्लास्टिकचे पुनर्वापर करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. -सुरभी मोरे, संचालिका, कॅफे बिग ब्ल्यू मारबल

Exit mobile version