देवरुखमध्ये होणार प्लास्टिक रिसायकलींग पायलट प्रोजेक्ट

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
प्लास्टिक बाटलीचे रिसायकलींग करून भविष्यात इंधन निर्मिती करण्याच्या दृष्टीने देवरुख नगरपंचायतीच्या सहकार्याने पायलट प्रोजेक्ट राबवला जाणार आहे. यासाठी पर्यावरण अभ्यासक सारंग ओक, पुजा फणसे यांनी देवरुख नगरपंचायत येथे प्राथमिक बैठक घेतली. यावेळी नगराध्यक्षा, सर्व नगरसेवक व विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
देवरूख शहरातील प्लास्टिक बाटली गोळा करण्यासाठी शालेय मुलांना या योजनेत सहभागी करुन घेतले जाणार आहे. 15 डिसेंबर ते 15 फेब्रुवारी या कालावधीत बाटल्या गोळा केल्या जाणार आहेत. यासाठी देवरुख शिक्षण प्रसारक मंडळच्या न्यू इंग्लीश स्कुल मधील आणि शाळा नंबर 3 व शाळा नंबर 4 मधील मुलांची निवड केली जाणार आहे. सामाजिक बांधिलकी म्हणुन या मुलांनी या बाटल्या आणुन शाळेत जमा करायच्या आहेत.यासाठी शाळेला वस्तुरुपात भेट दिली जाणार आहे.या गोळा झालेल्या बाटल्यांसाठी देवरुख नगरपंचायत जागा देणार आहे.
साडवली एमआयडीसीत हा प्रोजेक्ट उभारला जाणार आहे. या ठिकाणी या प्लास्टिकचे तीन प्रकारात रिसायलिंग करण्यात येणार आहे. हा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्यास नागरीकांनाही यात सहभागी करुन घेण्यात येणार आहे. स्नेह परिवाराच्या रेवा कदम यांच्यावर समन्वयक म्हणुन जबाबदारी देण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांच्या माध्यमातुन सारंग ओक यांनी हा पायलट प्रोजेक्ट देवरुख शहरासाठी राबवण्याचे ठरवले आहे. देवरुख परिसरातील हॉटेल,थंडपेय विक्रेते यांनी पाणी व थंडपेयाच्या बाटल्या बाहेर न टाकता संकलीत करुन ठेवाव्यात व शालेय मुलांकडे त्या द्याव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version