इमारतीमध्ये पावसाळ्यात पाणी गळतीचा त्रास
| अलिबाग | प्रतिनिधी |
शंभर वर्षे जूने असलेल्या मुरूडमधील ग्रामीण रुग्णालयाच्या दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग उदासीन ठरले आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी गळतीच्या समस्येला सामोरे जाण्याची वेळ कर्मचाऱ्यांसह रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांवर आली आहे. या रुग्णालयाला प्लास्टीक आधार देण्यात आला आहे. पावसाळ्यात ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवा ठप्प होत आहे. रुग्णांना चांगली सेवा मिळावी, यासाठी आरोग्य व्यवस्था सुधारण्याची मागणी शेतकरी कामगार पक्ष मुरूड तालुका पुरोगामी युवक संघटनाच्या वतीने करण्यात येत आहे.
पर्यटनाच्या दृष्टीने मुरूड महत्वाचे ठिकाण ओळखले जाते. वर्षाला दोन लाखहून अधिक पर्यटक मुरुडला भेटी देतात. बाहेरील पर्यटकांसह स्थानिकदेखील मुरूडला फिरण्यास येतात. पर्यटकांसह स्थानिकांचे आरोग्य राखण्यासाठी मुरूडमध्ये ग्रामीण रुग्णालय आहे. या रुग्णालयाच इमारत शंभर वर्षे जूनी आहे. दूरुस्तीअभावी या इमारतीमध्ये पावसाळ्यात पाणी गळतीचा त्रास कायम आहे. त्याचा रुग्णांना नाहक त्रास होतो.
रुग्णालयाच्या दोन्ही प्रवेशद्वारासमोर कॅटल ट्रॅपसह ट्रेनेज दूरुस्ती बांधकाम करणे. फतिमा बेगम रुग्णालयातील लिक्वीड ऑक्सीजन प्लांटसाठी गेटसह शेड बांधकाम करणे, रुग्णालयाच्या दोन्ही आवारातील इमारतीमध्ये वाळवी प्रतिबंधात्मक उपचार करून पेस्ट कंट्रोल करणे, वैद्यकिय अधीक्षकांच्या निवासस्थान आवारात पेव्हर ब्लॉक बसविणे, लॅबसाठी वॉश बेसिनसह ओटा बांधणे, अपघात विभाग रॅम्प ठिकाणी शेड बनविणे, कार्यालयाच्या दोन्ही मोठ्या दरवाजाच्या ठिकाणी पत्र्याचे शेड बांधणे, विद्यूत जनरेटर शेड बनविण्याबरोबरच त्या शेडला बंधिस्त करणे, वैद्यकिय अधीक्षक यांच्या कार्यालयाला सीलींग बसविणे, रुग्णालयाच्या इमारताली प्लास्टरसह रंगरंगोटी करणे, डायलेसीस वार्ड बनविणे, साधन सामुग्री ठेवण्यासाठी मोठे स्टोअर रुम बनविणे, अधिपरिचारिका शासकिय वसाहत रुम अपूऱ्या असल्याने नवीन शासकीय वसाहत गृह बांधकाम करणे, नवीन शस्त्रक्रीया गृह बांधणे, पावसाळ्यात होणारी गैरसोय लक्षात घेता अंतर्गत भागातील सांडपाण्याचे नियोजन करणे आदी विविध मागण्या आजही प्रलंबित आहेत.
रुग्णालयाच्या मागील बाजूला पावसाचे पाणी जाण्याचे मार्ग पुर्णतः बंद झाला आहे. पावसाचे पाणी साठून रुग्णसेवा ठप्प होत आहे. रुग्ण वाहिका शेड बसविण्याबरोबरच विद्यूत दूरुस्तीचे कामे करण्याची गरज निर्माण झाली आहे. मूरूडमधील ग्रामीण आरोग्य व्यवस्था खिळखिळी झाली आहे. संपुर्ण रुग्णालयाची इमारत ताडपत्रीने झाकून देखील पाण्याची गळती थांबत नाही. कर्मचाऱ्यांच्या वसाहतीची अवस्था दयनीय झाली आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे पाणी एकाच ठिकाणी साचून राहत आहे.
बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
मुरूडमधील ग्रामीण रुग्णालयाच्या हाकेच्या अंतरावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय आहे. रुग्णालयातील या समस्यांबाबत वारंवार मागणी करूनदेखील त्यांच्याकडून बघ्याची भुमिका घेतली जात आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.
ज्या लोकप्रतिनिधींना जनतेने निवडून दिले, त्या लोकप्रतिनिधींनी दूरुस्तीकडे लक्ष दिले नाही. बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले. वारंवार दुरुस्ती काढून ठेकेदाराने पैसे काढण्याचे काम केले आहे. तलावाचे स्वरूप रुग्णालयाला आले आहे. दुरुस्तीची मागणी करूनदेखील दुर्लक्ष होत आहे. शवविच्छेदन गृहाच्या मागील एक उघडी टाकी आहे. त्यावर आवरणदेखील बसविण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाची उदासीनता आहे. तालुका प्रशासनदेखील लक्ष देत नाही. सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत आहे. औषधांची कमतरता आहे. पाण्याची गळती रुग्णालयात आहे. त्याचा नाहक त्रास होत आहे. नगरपरिषदेने लक्ष देणे गरजेचे आहे. स्वच्छता, फवारणी नगरपरिषद प्रशासन करीत नाहीत, अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
मनीष माळी,
उपाध्यक्ष, शेकाप पुरोगामी युवक संघटना, मुरुड







