बॅडमिंटन कोर्टवर हृदय विकाराने खेळाडूचा मृत्यू

| इंडोनेशिया | वृत्‍तसंस्था |

इंडोनेशियात सुरू असलेल्या आशिया ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. चीन आणि जपान यांच्यात सामना सुरू होता. या सामन्यात चीनकडून झांग झिजी खेळत होता, तर जपानकडून काझुमा कावाना कोर्टवर होता. सामन्यादरम्यान चीनचा खेळाडू अचानक कोर्टवर कोसळला आणि यानंतर त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेक यूजर्स यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. या खेळाडूला लवकर मदत मिळाली असती तर त्याला वाचवता आले असते, असे युजर्स लिहित आहेत.

रविवारी (दि.30 जून) संध्याकाळी उशिरा चीनचा झांग झिजी आणि जपानचा काझुमा कावाना यांच्यात आशिया ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिपचा एकेरी सामना खेळला जात होता. पहिला गेम 11-11 असा बरोबरीत असताना झांग अचानक जमिनीवर पडला. आधी त्याच्यावर कोर्टवरच उपचार करण्यात आले आणि नंतर ॲम्ब्युलन्सने त्याला हॉस्पिटलमध्ये नेले. परंतु त्याचा जीव वाचवता आला नाही. चीनचा खेळाडू झांग झिजी रविवारी संध्याकाळी एका सामन्या दरम्यान कोर्टवर कोसळला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे रात्री 11:20 वाजता त्याचा मृत्यू झाला, असे बॅडमिंटन आशिया आणि बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडोनेशियायांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, बॅडमिंटन जगताने एक प्रतिभावान खेळाडू गमावला.

Exit mobile version