दोन एकरात मैदान विकसित करण्याचा मानस
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळजवळील जिते ग्रामपंचायतीमधील बोर्ले गावात दोन एकर जागेमध्ये क्रीडांगण विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या पुढाकाराने हे क्रीडांगण विकसित होत असून, या क्रीडांगणाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या सरपंच रेणुका मिरकुटे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण विकसित कार्याचा शुभारंभ करण्यात आला.
पूर्वीच्या कोल्हारे ग्रामपंचायत आणि आताच्या जिते ग्रामपंचायतीमधील बोर्ले गावात मोठ्या प्रमाणात गुरचरण जमीन आहे. या जमिनीतील दोन एकर भूखंडावर क्रीडा केंद्र विकसित व्हावे, असे स्वप्न गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ शशिकांत मोहिते यांनी पाहिले होते. सध्या बोर्ले परिसरात नवीन लोकवस्ती वाढत आहे. वयोवृद्धांना सकाळी चालण्यास मोकळे मैदान मिळेल, संपूर्ण जिते ग्रामपंचायतीमधील तरुणांना मैदानी खेळ खेळण्यास वाव मिळेल. यासाठी येथील दोन एकर जमिनीवर क्रीडांगण विकसित केले जात आहे. या क्रीडांगणाला छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण असे नाव देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता. हे मैदान विकसित होण्यासाठी ग्रामस्थांची ग्रामपंचायतीकडे मागणी सुरू आहे. मात्र, या कामाचा शुभारंभ आणि नामफलक अनावरण करण्याचा कार्यक्रम ग्रामस्थांच्या उपस्थितीत झाला.
यावेळी मौजे बोर्ले येथे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण या कमानीचे लोकार्पण जिते सरपंच रेणुका मिरकुटे यांच्या हस्ते फीत कापून झाले. यावेळी माजी उपसरपंच तुकाराम भोईर, माजी उपसरपंच प्रसाद टोंडलेकर तसेच ग्रामविकास अधिकारी पांडुरंग म्हसे, ग्रामपंचायत सदस्य वंदना भोईर, वंदना हजारे आणि ग्रामस्थ शशिकांत मुकुंद मोहिते आदी उपस्थित होते.







