खासगी शाळा-क्लासेसचा ‌‘रिसॉर्टी’ धंदा

विद्यार्थ्यांच्या सहलींच्या नावाखाली जीवाशी खेळ; शिक्षण विभागाचे डोळे मिटलेलेच

| उरण | प्रतिनिधी |

शैक्षणिक सहली विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी असतात, पण उरणसह राज्यभरातील काही खासगी शाळा आणि क्लासेसनी या शैक्षणिक संकल्पनेचा चक्क ‌‘रिसॉर्ट सफरी’मध्ये’ रूपांतर केल्याचे स्पष्ट झाले आहे. अलीकडेच अकोल्यातील एका खासगी क्लासने 13 विद्यार्थ्यांना घेऊन काशीद समुद्रकिनारी सहल काढली असता, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने एका शिक्षकासह एका विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. हा दुर्दैवी प्रकार घडूनही शिक्षण विभागाकडून अशा सहलींवर कोणताही प्रतिबंध किंवा नियंत्रण नसल्याचे चित्र आहे.

उरण तालुक्यातही अनेक खासगी शाळा शैक्षणिक सहलींच्या नावाखाली वॉटर पार्क, रिसॉर्ट आणि मनोरंजन स्थळांवर सहली नेत आहेत. गड-किल्ले, विज्ञानकेंद्र, तारांगण, संग्रहालये अशा ज्ञानवर्धक ठिकाणी सहली नेण्याचे बंधन असतानाही, शाळा आणि शिक्षक मात्र ‌‘कमिशन’ मिळणाऱ्या ठिकाणांकडे विद्यार्थ्यांना वळवत आहेत. या सहलींसाठी पालकांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारले जात आहेत, तर शिक्षण विभाग याकडे डोळेझाक करत असल्याने नागरिक आणि पालकवर्गामध्ये संतापाचे वातावरण आहे. उरण तालुका मराठी पत्रकार संघ यांच्याकडून या संदर्भात वारंवार तक्रारी करण्यात आल्या असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताशी खेळ करणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करून सहली काढणाऱ्या शाळा व क्लासेसविरुद्ध तात्काळ चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गटशिक्षणाधिकारी घरत मॅडम व गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांच्याकडे केली आहे.

Exit mobile version