पालीकरांच्या आरोग्याशी खेळ सुरू?

पूरानंतरही शुद्धीकरण औषधांचे वाटप नाहीच

| पाली/ वाघोशी | प्रतिनिधी ।

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे अंबा नदीला आलेल्या पुराचा परिणाम पाली शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला असून, नगरपंचायतीच्या जॅकवेलमधून अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उबाठा) पाली शहर प्रमुख विद्देश आचार्य यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे पालीकरांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याची टीका त्यांनी केली.

अतिवृष्टीमुळे नदीचे पाणी गढूळ झाले असून, अशुद्ध पाणी नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचत आहे. अशा परिस्थितीत नगरपंचायतीने तातडीने पाणी शुद्धीकरणाची उपाययोजना करणे अपेक्षित असताना प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही आचार्य यांनी केला.

अशुद्ध पाण्यामुळे पाली शहरात गॅस्ट्रो, अतिसार, कावीळ, टायफॉईड यांसारख्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नगरपंचायतीने तातडीने क्लोरीवॅटचे मोफत वाटप सुरू करावे, पाण्याची गुणवत्ता तपासावी आणि नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारावी, अन्यथा शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही विद्देश आचार्य यांनी दिला.


पाली येथे पाणी शुद्धीकरणासाठी अत्याधुनिक फिल्टर यंत्रणा उपलब्ध नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यात ‘क्लोरीवॅट’ हे पाणी शुद्धीकरणासाठी वापरले जाणारे औषध टाकण्यासाठी नागरिकांना मोफत वाटप करण्यात येत होते. पूर्वी पाली ग्रुप ग्रामपंचायतीच्या काळात तसेच गेल्या चार वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या नगरपंचायतीकडूनही ही सुविधा नियमित दिली जात होती. मात्र, यंदा जुलै महिना सुरू होऊनही अद्याप नागरिकांना या औषधाचे वाटप करण्यात आलेले नाही.

विद्देश आचार्य
शिवसेना (उबाठा) पाली शहर प्रमुख
Exit mobile version