प्रकल्पग्रस्तांच्या जिवाशी खेळ

| अलिबाग | प्रतिनिधी |

जेएसडब्ल्यू कंपनीने आपल्या मागण्या पुर्ण कराव्यात यासाठी गेल्या पाच दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुरुड तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपोषण सुरु केले आहे. मात्र प्रशासनाकडून ठोस भूमिका न घेतल्याने उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडत चालली आहे. आजपर्यंत पाच जणांची प्रकृती खालावली असून तिघांना उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. गेल्या पाच दिवासांपासून सुरु असलेल्या या लढ्याबाबत प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याने प्रकल्पग्रस्तांच्या जिवासी खेळत असल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत.

सामंजस्य कराराचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पासाठी अधिग्रहित केलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत करा, या मागणीसाठी चेहर, मीठेखार, वाघुळवाडी निडी, साळाव, नवीन चेहेर या गावातील प्रकल्पग्रस्त शेतकरी मागील सहा दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेएसडब्लू कंपनीविरोधात उपोषणाला बसले आहेत. उपोषणाला सहा दिवस होत आली आहेत, तरीदेखील प्रशासन कोणतीही भुमिका घेत नाही. त्यामुळे उपोषणाच्या सहाव्या दिवशी भर पावसात जे.एस.डब्ल्यू आणि रायगड जिल्हा प्रशासनाच्या विरोधात संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला आहे. शेकडो महिला पुरुष आपल्या संतप्त भावना व्यक्त करीत आहेत.

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रत्येक घरातील एका व्यक्तीला नोकरी देणार, नोकरी न दिल्यास दर महिन्याला भत्ता देणार, गावांमध्ये वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करणार, असा सामजंस्य कराराचे उल्लंघन जेएसडब्लू कंपनीकडून होत असताना प्रशासन ठोस भूमिका घेत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. उपोषणामध्ये माधुरी मुंबईकर, जनार्दन रोटकर, नीलेश ठाकूर यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तसेच संतोष ठाकूर, दीपक रोटकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची प्रकृती बिघडत असल्याने त्यांच्या जिवाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसलो आहे. पाच जणांची प्रकृती बिघडली असून तिघांना दवाखान्यात दाखल केले आहे. प्रशासन व जेएसडब्लू कंपनी अद्यापर्यंत कोणतीही भुमिका घेत नाही. हा लढा शेवटपर्यंत असणार आहे. न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वच जण आत्मदहन करणार आहोत.

संतोष ठाकूर, उपोषणकर्ते

उद्या होणार बैठक
मुरुड तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी 18 जूलै रोजी प्रकल्पग्रस्त व जेएसडब्लू कंपनीचे अधिकारी यांच्या समवेत बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत जिल्हाधिकारी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Exit mobile version