पाण्याच्या पाइपलाईनवर टाकला जातोय कचरा; संतप्त नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
| वावोशी | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील वाशी खारेपाट विभागात जनतेच्या आरोग्याशी थेट खेळ खेळला जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया आता आवाज बनू लागली आहे. वाशीनाका ते वाशी व वढाव गावापर्यंतची मुख्य जलवाहिनी जी खारेपाटातील गावांना पिण्याचे पाणी पुरवते, ती पूर्णपणे जीर्ण अवस्थेत असून, तिच्यावर थेट कचऱ्याचे ढिगारे टाकले जात आहेत.
विशेष म्हणजे, उंबर्डे ग्रामपंचायतीकडून तब्बल 5-6 किलोमीटर दूरवरून ट्रॉलींमधून कचरा आणून या पाइपलाईनवर फेकला जातो आहे. परिणामी, या पाईपमधून जनतेच्या घरांपर्यंत पोहोचणारे पाणी दुर्गंधीयुक्त, विषारी आणि आजारांना आमंत्रण देणारे बनले आहे. या पाण्यामुळे गेल्या वर्षी चार निष्पाप नागरिकांचा काविळीमुळे मृत्यू झाला होता. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, हे फक्त दुर्लक्ष नव्हे तर सदोष मनुष्यवधासारखा गंभीर गुन्हा आहे.
ग्रामपंचायत आणि पाणीपुरवठा विभाग यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत हे आरोग्यसंकट निर्माण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. नागरिकांच्या मते, दुर्गंधीयुक्त पाणी जनतेच्या घरांपर्यंत पोहोचत आहे आणि यामुळे टायफॉईड, गॅस्ट्रो, उलटी-जुलाब यांसारख्या साथीचे आजार पसरत आहेत. पाईपलाईनची अवस्था इतकी वाईट आहे की ती अनेक ठिकाणी फुटली असून, फुगवलेली बिले तयार करून केवळ कागदोपत्री देखभाल दाखवली जाते. आरोग्य विभागही या गंभीर परिस्थितीविषयी मौन बाळगून आहे. कोणतीही सार्वजनिक सूचना किंवा प्रतिबंधात्मक उपाय यंत्रणा अस्तित्वात नाही. जर प्रशासन आणि ग्रामपंचायतींनी याकडे गांभीर्याने दखल घेतली नाही, तर आमच्या जिवाशी खेळणाऱ्यांवर आयपीसी अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा लागेल, असा स्पष्ट इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे. यासोबतच आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
चार निष्पापांच्या मृत्यूनंतरही पिण्याच्या पाण्यावर कचरा टाकला जात असेल, तर हे केवळ निष्काळजीपणाच नव्हे, तर गुन्हाच आहे. हा प्रकार आरोग्याचे नव्हे तर जगण्याच्या मूलभूत हक्काचे उल्लंघन आहे. जबाबदारांवर कायदेशीर कारवाई न झाल्यास खारेपाटातील जनता आता स्वस्थ बसणार नाही.
राजेंद्र झेमसे,
सामाजिक कार्यकर्ते, वाशी-पेण






