| उरण | वार्ताहर |
उरणच्या आमदारांच्या उरण मतदार संघातील एका आदिवासी वाडीतील ग्रामस्थांना त्यांच्या गावातील प्रेत चक्क वाहत्या नदीतून पलीकडे नेत त्याच्यावर अंत्यसंस्कार करावे लागले असल्याची सनसनाटी घटना समोर आली आहे. ज्या वाहत्या नदीतून या आदिवासी बांधवांचे प्रेत वाहत्या पाण्यातून न्यावे लागले त्या नदीवर पुल बांधणीचे भूमिपूजन आमदार बालदी यांच्या हस्ते सुमारे पाच ते सहा महीन्यांपूर्वी झाले आहे. मात्र, पुलाच्या बांधकाची एखादी वीट देखील त्याठिकाणी लावली गेली नसल्याचे वाडीवरील आदिवासी बांधवांचे म्हणणे आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार उरण विधानसभा मतदार संघात मोडत असलेल्या खालापूर तालुक्यातील आरकत वाडी येथील रहिवासी कमल बाळू चौधरी यांचे निधन झाले होते. स्मशानभूमी नदीच्या पलीकडे पीरकत वाडीत असल्यामुळे त्यांचे प्रेत आदिवासी बांधवांना अक्षरशः खांद्यावर घेत नदीतून पलीकडे नेत अंत्यसंस्कार करावे लागले आहेत. या निमित्ताने सर्व आदिवासी बांधवांना जीवाशी खेळ करावा लागला आहे. नदीचा जोरदार प्रवाह असताना त्यांची अंत्ययात्रा या प्रवाहातूनच न्यायला लागली आहे. उंबरवाडी पीरकतवाडी आणि आरतवाडी येथील आदिवासी समाजाने बरीच वर्षे झाली मागणी केली आहे, की येथे येण्या-जाण्यासाठी मुलांच्या शाळेसाठी पुलाची गरज आहे परंतु या पुलाची नुसते नावापुरते भूमिपूजन उरण मतदार संघाचे आमदार बालदी यांनी केले असून आज रोजी पर्यंत येथे साधा दगडही त्या पुलाच्या बांधकामासाठी पडलेला नाही आहे. शाळा ही पलीकडे असल्यामुळे लहान मुला मुलींना सुद्धा याच प्रवाहातून शाळेत जावे लागत आहे. कोण आजारी असल्यावर नदीच्या प्रवाहातून पलीकडे नेऊन उपचार करावे लागत आहेत. आदिवासी समाजाचा वापर फक्त मते मिळविण्यासाठी केला जात असून त्यांचा विकास शून्य आहे. असे आदिवासी समाजातील सुशिक्षित वर्ग बोलू लागला आहे.






