आनंददायी वातावरणामुळे पर्यटनवाढीस चालना

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| पाली | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यात यंदाचा ऑक्टोबर महिना नेहमीपेक्षा वेगळा ठरत आहे. साधारणपणे या काळात उकाडा असह्य होतो आणि ‘ऑक्टोबर हीट’चा त्रास सर्वांनाच भेडसावतो. यंदा मात्र परतीच्या पावसाने हवेत गारवा आणल्याने उकाड्याची चाहूलच लागली नाही. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात सकाळी व रात्री हलका गारवा जाणवत असून, थंडीची चाहूल लागली आहे. त्यामुळे वातावरण आल्हाददायक झाले असून, पर्यटक आणि प्रवासी दोघेही या बदलाचा मनमुराद आनंद घेत आहेत.

जिल्ह्यात पहाटेपासूनच सर्वत्र दाट धुक्याची दुलई पसरते. या धुक्यामुळे महामार्गांवरील वाहतूक धीम्या गतीने सुरू असली तरी परिसरातील दृश्ये नयनरम्य बनली आहेत. डोंगर, कडे, दऱ्या आणि हिरव्या झाडांच्या फांद्यांवर दवबिंदू चमकत असल्याने वातावरण जणू एखाद्या निसर्गचित्रासारखे दिसते. विशेषतः ताम्हिणी घाट, वरंधा घाट आणि मोर्बे घाटातून प्रवास करताना ढगांच्या चादरीतून जाण्याचा अनुभव पर्यटकांना मोहवून टाकतो. रायगड जिल्ह्यातील रायगड किल्ला, सुधागड, सरसगड, मानगड, सुरगड, मृगगड, विश्रामगड आणि कर्नाळा यांसारख्या दुर्गम किल्ल्‌‍यांवर ढगांची दाटी आणि धुक्याची चादर पसरलेली असते. त्यामुळे ट्रेकर्स, दुर्गप्रेमी आणि निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने येथे भेट देत आहेत. ताजे, प्रफुल्लित आणि मन:शांती देणारे हे वातावरण पर्यटकांना आकर्षित करीत असून, स्थानिक पर्यटन उद्योगालाही चालना मिळत आहे.

Exit mobile version