बद पाणपोईकडे तहसील प्रशासनाचा दुर्लक्ष
| पाली/वाघोशी | वार्ताहर |
सुधागड तालुक्याच्या मुख्यालय पाली येथे असणार्या तहसील कार्यालयात येणार्या नागरिक व कर्मचार्यांसाठी श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अलिबाग यांच्या वतीने लाखो रुपये खर्च करून सुबक अशी पाणपोई उभारली आहे. परंतु, तहसील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बंद झालेल्या पाणपोईमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले जातात. महसुली कामानिमित्त सुधागड तालुक्यातील खेडोपाड्यातून अनेक आदिवासी ठाकूर व इतर जनता येत असते. या सर्वांना या पाणपोईच्या माध्यमातून पाणी पिणे सोयीचे होत होते. मात्र, ज्या तहसील कार्यालयाच्या सोयीसाठी ही पाणपोई उभारली.
त्याच तहसील प्रशासनाला या पाणपोईकडे लक्ष द्यायला वेळ नाही. परिणामी, ही पाणपोई नेहमीच बंद असते. यामुळे येणार्या नागरिकांची गैरसोय होत आहे. याबाबत नायब तहसीलदार दत्तात्रय गोष्टी यांना विचारणा केली असता काही तांत्रिक बिघाड झाल्याने ही पाणपोईची फिल्टर मशीन बंद झाली आहे. काही महिन्यांपासून बंद असलेल्या मशीनला आम्ही लवकरच तांत्रिक अडचण दूर करून पाणपोई सुरळीत सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
याबाबत शेकाप पाली शहर सहचिटणीस संजोग शेठ यांनी तहसील प्रशासनावर ताशेरे उडत सांगितले की तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेतून सर्वांसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी याकरिता लाखो रुपये खर्च करून पाणपोई बांधून दिली असली तरी तहसील कार्यालयाकडे दुर्लक्ष करत असेल आणि लोकांचे हालअपेष्टा करत असेल तर ही बाब निंदनीय आहे.