पाण्याअभावी नागोठणेकरांचे हाल

जेएसडब्ल्यू जलवाहिनीचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद

| नागोठणे | वार्ताहर |

नागोठण्यातील के.टी. बंधाऱ्यातील पाण्याची पातळी घटल्याने जेएसडब्ल्यू कंपनीच्या पंपहाऊसमधील पंप बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे नागोठणे शहरासह डोलवी (ता.पेण) पर्यंतच्या 42 गावांना जेएसडब्ल्यू कंपनीच्या जलवाहिनीद्वारे होणारा पाणीपुरवठा दोन दिवस बंद आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर महिलावर्गाची घराच्या साफसफाईसह इतर कामे सुरू असतानाच पाणीपुरवठा दोन दिवस बंद झाल्याने या जलवाहिनीवर अवलंबून असलेल्या नागोठण्यासह 42 गावांतील नागरिकांचे विशेषतः महिलावर्गाचे पाण्यासाठी प्रचंड हाल झाले.

नागोठणे शहरातील अर्ध्याहून अधिक भागालाही याच जेएसडब्ल्यू कंपनीच्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. तर, काही भागाला एम.आय.डी.सी.च्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, के.टी. बंधाऱ्यातील पाण्याची पातळी घटल्याने या जलवाहिनीवर अवलंबून असलेल्या नागोठण्यातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. त्यामुळे नागोठणे शहरातील अनेक गृहनिर्माण संस्थांना आपले पैसे मोजून खासगी टँकरद्वारे पाणी मागवावे लागले व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. पाणीटंचाईमुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान, नागोठण्यातील के.टी. बंधाऱ्याची प्रस्तुत प्रतिनिधीने मंगळवारी पाहणी केली असता बंधाऱ्यात पुरेसा पाणीसाठा आढळून आला नाही. त्यामुळे बंधाऱ्याशेजारी असलेल्या जेएसडब्ल्यू कंपनीच्या पंप हाऊसला भेट दिली असता तेथील खड्ड्यातही पुरेशा पातळीपर्यंत आवश्यक असलेला पाणीसाठा आढळून आला नाही.

अंबा नदीला डोळ्वहाळ बंधाऱ्यातून पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, पंपहाऊसच्या खड्ड्यात आवश्यक ती 4.5 मीटरची पातळी पाण्याने न गाठल्याने मंगळवारी (दि.7) संध्याकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरु करण्यात आला नव्हता. त्यामुळे बंधाऱ्याची पाण्याच्या पातळीत रात्रभर आवश्यक ती वाढ झाल्यानंतर सकाळी पाणीपुरवठा सुरू करण्याचे आदेश जेएसडब्लू कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिल्याने बुधवारी पहाटेच पाणीपुरवठा सुरु होईल, असेही पंपहाऊस मधील कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version