बसस्थानकाअभावी प्रवाशांचे हाल

| तळा | वार्ताहर |

तळा शहरातील तळा बसस्थानकाच्या दुरुस्तीचे काम हे संथगतीने सुरू असल्याने बसस्थानकाअभावी प्रवाशांचे हाल होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

तळा बसस्थानक दुरुस्तीच्या कामासाठी दहा लक्ष रुपये मंजूर करण्यात आले असून त्याचे उद्घाटन महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत दि.18 डिसेंबर रोजी करण्यात आले होते. तद्नंतर बसस्थानक दुरुस्तीच्या कामास सुरुवातही करण्यात आली. मात्र प्रवाशांना बसण्यासाठी कोणतीही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली नाही. अशातच दुरुस्तीचे काम संथगतीने सुरू असून गेल्या तीन दिवसांपासून हे काम बंद असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. इतरत्र कोठेही बसण्याची व्यवस्था नसल्याने प्रवाशांसह शालेय विद्यार्थ्यांना भर उन्हात गाडीची वाट पाहत उभे राहावे लागत आहे. तर वयोवृद्ध नागरिकांना बसण्यासाठी आजूबाजूच्या दुकानांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने बसस्थानक दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात आहे.

Exit mobile version