एआयपीएच्या वतीने अतिरिक्त मुख्य सचिवांना निवेदन
| खारेपाट | वार्ताहर |
एसटी महामंडळाने रायगड जिल्ह्यातील अनेक एसटी सेवा बंद केल्या आहेत, त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. महत्त्वाचे म्हणजे, सध्या मुंबई-रेवस जलवाहतूक सेवा पण बंद आहे. पावसाळी जलवाहतूक बंदच्या काळात एस.टी. चे पर्याची पावसाळी वेळापत्रक सुरु होते. दुर्दैवाने अलिबाग तालुक्यातून मुंबई, बोरिवली, ठाणे, नवी मुंबईकडे जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढत आहे. मात्र, एस.टी. सेवा अपुरी पडत आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रक्षोभ वाढत आहे. या बाबीचा विचार करुन ऑल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी राज्याचे परिवहन व बंदरे विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांची असोसिएशनच्या शिष्टमंडळासहीत प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
प्रवाशांसाठी अत्यावश्यक असलेल्या पेण आगाराची सकाळी 6.45 वाजताची मांडवा-ठाणे, रेवस ते कोकणभवन ही सकाळी 7 वाजताची सेवा, रेवस-ठाणे सकाळी 8 वाजताची सेवा, सकाळी 10.15 ची मांडवा-पेण, मुंबईहून हाशिवरेमार्गे रेवस ही सायंकाळी 6.15 वा. सुटणारी सेवा, दुपारी 3.45 वा.ची मांडवा हाशिवरेमार्गे बोरिवली सेवा ह्या सेवांना असलेला प्रवाशांचा प्रतिसाद पाहता व प्रवाशांची गरज पाहता त्या त्वरित सुरु व्हाव्यात. तसेच पनवेल-अलिबाग मार्गावर थेट एस.टी. सेवा सुरु आहे. या सेवेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद असलेला कार्लेखिंड थांबा द्यावा, कारण कार्लेखिंड परिसरातील 25-30 गावांना थांबा नसल्यामुळे 7 कि.मी. पुढे अलिबागला जाऊन पुन्हा परत यावे लागते, त्यामुळे त्यांची होणारी कुचंबणा थांबवावी, अशी आग्रही मागणी अेआयपीएचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव परिवहन व बंदरे संजय सेठी यांच्यासमोर केली.
याबाबात सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले व संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या. शिष्टमंडळात असोसिएशनचे पदाधिकारी विश्वास मोरे, प्रतिभा कारेकर, उदय सकपाळ आदींचा समोवश होता.