स्वातंत्र्यपूर्व काळातील पोलीस निवासाची दुर्दशा; स्वातंत्र्यानंतरही उपेक्षा

। माणगाव । प्रतिनिधी ।

ब्रिटिश सरकारच्या काळापासून उभे असलेले माणगाव येथील पोलीस चौकी आणि त्या चौकी जवळच असणारे कर्मचार्‍यांना राहण्यासाठी बांधलेले निवास आजही स्वातंत्र्यानंतर उभे आहे. मात्र, शेकडो वर्षांपूर्वीच्या निवासाची दुर्दशा झाली असून, या निवासात कोणीही पोलीस कर्मचारी राहात नसल्याने हे पोलीस निवास भूतबंगलाच बनले आहे. याकडे लोकप्रतिनिधी व शासनाने पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरही माणगाव वसाहतीची उपेक्षा कायमच राहिली आहे.

‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटिबद्ध आहेत. नागरिक आणि कायद्यांच्या रक्षणासाठी पोलिसांचे योगदान महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात माणगाव येथे 1918-19 मध्ये दगडी चिर्‍यामध्ये केलेले पोलीस चौकीचे बांधकाम याला 103 वर्षे पूर्ण होऊन गेली. ही पोलीस चौकी आजही तितक्याच दिमाखात उभी आहे. याचा रास्त अभिमान माणगावकरांना आहे. या चौकीजवळच त्यावेळी ब्रिटिश सरकारने कर्मचार्‍यांसाठी त्या वेळची कर्मचारी संख्या लक्षात घेता निवासस्थान उभारले होते. माणगाव पोलीस वसाहतीत राज्य सरकारने निवासस्थानाच्या वेळोवेळी दुरुस्त्या केल्या. मात्र, ही नादुरुस्त निवासस्थाने दुरुस्त करण्याऐवजी ती पाडून नव्याने बांधणे गरजेचे असताना, याकडे दुर्लक्षच झाल्यामुळे स्वातंत्र्यानंतरही माणगाव पोलीस कर्मचार्‍यांच्या निवासाची उपेक्षा कायम राहिली आहे.

माणगाव पोलीस ठाण्यात 1967 – 68 मध्ये पोलीस अधिकार्‍यांसाठी एक निवासस्थान तर 2 चाळीमध्ये 26 कर्मचारी राहात होते. सन 1985-86 मध्ये तिसरी चाळ बांधण्यात आली. यात 12 निवासस्थाने बांधण्यात आली होती. त्यात 12 पोलीस कर्मचारी राहात होते. या तिन्ही चाळीचे क्षेत्र 7081.40 चौरस मीटर असून, ही जागा शासनाची आहे. या निवासस्थानाची दुरुस्त्या 2015 पूर्वी वेळोवेळी करण्यात आल्या. सध्या हे बांधकाम खूप जुने असल्यामुळे त्या काळी बैठे जोते बांधून त्यावर बांधकाम करण्यात आले होते. कालांतराने आजूबाजूच्या परिसरात रस्त्याच्या सुधारणा झाल्यामुळे भराव यामुळे जुन्या इमारतींना पावसाळ्यात भिंतीमध्ये ओलावा निर्माण होऊन त्या नादुरुस्त होत गेल्या.

गेल्या दोन वर्षांपूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने निवासावरील पत्रे उडाले, भिंती पडल्या यामुळे दोन वर्षात या निवासाची प्रचंड नुकसान झाले असून, दुर्दशाच झाली आहे. ही निवासस्थाने सर्वसोयींनीयुक्त नव्याने बांधावीत, अशी मागणी होत आहे.

माणगाव पोलीस ठाणे अंतर्गत 140 गावांचा समावेश आहे. या पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक एक, सहा. पोलीस निरीक्षक एक, पोलीस उपनिरीक्षक तीन तसेच 63 कर्मचारी या पोलीस ठाण्यात काम करतात. हे सर्व 68 अधिकारी व सर्व कर्मचारी गेली अनेक वर्षांपासून भाड्याच्या खोलीत राहतात. या अधिकारी कर्मचार्‍यांना शासनाकडून निवासभत्ता साधारण 2000 ते 2500 रुपये मिळतो. बाहेर खासगी घरांचे भाडे साधारण किमान 5000 रुपयांपुढे आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांना हे भाडे परवडत नाही. ‘आई जेवू घालीना, बाप भिक मागू देईना’ अशीच स्थिती झाली आहे.

Exit mobile version